ज्येष्ठ नागरिकास ५० लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 03:24 AM2018-01-04T03:24:22+5:302018-01-04T03:24:34+5:30
चांगल्या परताव्याची हमी देऊन फायनान्स कंपनीत गुंतवणुक करण्यास लावून ज्येष्ठ नागरिकास तब्बल ५० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे़
पुणे : चांगल्या परताव्याची हमी देऊन फायनान्स कंपनीत गुंतवणुक करण्यास लावून ज्येष्ठ नागरिकास तब्बल ५० लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे़
याप्रकरणी शंकर महाडिक (वय ६४, रा़ कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी किशोर मारुतीराव टमके (रा़ बालाजीनगर) आणि अप्पासाहेब शिवाजी पाटील (रा़ मांजरी बु़) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान घडला़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडिक हे २०१४ मध्ये बँक आॅफ महाराष्ट्रमधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा व सून हे दोघे उच्चपदावर काम करतात. तर त्यांची मुलगी अमेरिकेत राहण्यास आहे.
्दरम्यान त्यांचे बालाजीनगर येथे त्यांचे मित्र रामभाऊ जाधव राहतात. किशोर टमके हा त्यांचा जावई आहे. त्यांचे कौैटुंबिक संबंध आहेत. टमकेने अप्पासाहेब पाटील याच्याशी ओळख करून दिली. ते दोघे भाग्य लक्ष्मी फायनान्स नावाने फायनान्सचा व्यवसाय करत असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्या व्यवसायात चांगली वसूली होत असल्याचे महाडिक यांच्या मनावर बिंबवले. त्यांनी आलेले पैसे बँकेत गुंतविण्यापेक्षा दोघांच्या व्यवसायात गुंतविल्यास जास्त परतावा मिळेल असे अमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी महाडिक यांच्याकडून २०१४ अखेरपर्यंत तब्बल ७५ लाख रुपये घेतले. या रकमेच्या वेळोवेळी पोचपावत्या मागितल्या मात्र त्या त्यांनी दिल्या नाहीत. महाडिक यांनी याबाबत त्यांच्या कुटुंबियांना काहीच सांगितले नव्हते. मात्र कुटुंबियांनी याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी खरा प्रकार सांगितला. त्यानंतर २०१५ -१६ पर्यंत त्यांचा व्यवसाय चांगला चालल्याचे समजून पैसे मागितले नाहीत.
मात्र कुटुंबियांनी टमके व पाटील यांना विचारणा केल्यावर त्यांचा व्यवसाय तोट्यात चालल्याचे सांगून महाडिक यांनी दिलेल्या पैश्यांपैकी केवळ मुद्दल ७५ लाख रुपयेच परत देणार असे सांगितले. त्यानंतर त्यातील पंचवीस लाखांच्या मोबदल्यात सोलापूर रोडवर असलेल्या सात एकर जमीनीचे खरेदी खत करून दिले. उर्वरित पन्नास लाख दोघे वाटून देणार आहेत. असे सांगून स्टॉम्प पेपरवर लिहून दिले आणि त्या रकमांचे धनादेशही दिले. मात्र ते वटलेच नाहीत. त्यानंतर महाडिक यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे़