जेजुरीत गाढवांच्या बाजारात ५० लाखांची उलाढाल
By admin | Published: January 25, 2016 12:59 AM2016-01-25T00:59:56+5:302016-01-25T00:59:56+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबादेवाच्या पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबादेवाच्या पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. पौष पौर्णिमा यात्रा असल्याने अठरापगड जाती-जमातींच्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरवर्षी पौष पौर्णिमेला अठरापगड जाती-जमातींची जेजुरीत मोठी यात्रा भरते. वैदू, कोल्हाटी, बेलदार, कैकाडी, वादारी, कुंभार, डोंबारी, परीट, पाथरवट, गारुडी आदी भटक्या जाती-जमातींचे लोक यात्रेनिमित्त जेजुरीत आले आहेत.
या जाती-जमातीतील अनेक लोकांचा उदरनिर्वाह गाढवावर अवलंबून आहे. माती, विटा, वाळू, डोंगरपठारावर ओझी वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. दरवर्षी तीर्थक्षेत्र जेजुरीनगरीत कुलदैवताच्या दर्शनाबरोबरच गाढवांच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्या संख्येने लोक येतात. आधुनिक यंत्रयुगात वाहनांचा वापर वाढल्याने गाढवाच्या पाठीवरील ओझे कमी झाले आहे व त्यामुळे गाढवांच्या बाजाराला दिवसेंदिवस उतरती कळा सुरू झाली आहे.
जेजुरीत शुक्रवारपासून (दि. २२) बंगाली पटांगणात गाढवाच्या बाजाराला सुरुवात झाली. या बाजारासाठी गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक याबरोबरच राज्यातील पुणे, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, जालना, नांदेड आदी भागांतून व्यापारी तसेच विविध जाती-जमातीचे लोक या बाजारात सहभागी झाले होते.
गाढव खरेदी करताना त्याचे दात व वय पाहिले जात होते. दोन दाताचा दुवान, चार दाताचा चवान, कोरा अखंड अशी निवड करून गाढवांची किंमत ठरवली जात होती. गावठी गाढवांना पाच हजारांपासून किंमत मिळाली, तर गुजरातमधील काठेवाडी गाढवांना सुमारे तीस त पस्तीस हजार रुपयांपर्यंत किंमत मिळाली. या बाजारात हजारहून अधिक गाढवांची विक्री होऊन पन्नास लाखांवर रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गाढवाबरोबरच धनगरी घोड्यांचाही बाजार येथे भरला होता. सुमारे पन्नास घोडे विक्रीसाठी आले होते. (वार्ताहर)