५० लोकांचे जीव तुझ्या हातात; सुरुवातीला कुटुंबाचा नकार, 'ती' ने धाडसाने स्टेअरिंग घेतले हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 03:14 PM2024-10-09T15:14:50+5:302024-10-09T15:18:19+5:30
धाडसी व्यक्तिमत्त्व, जबाबदारीचे काम असून ५० लोकांचे जीव हातात, काही वाईट झाले तर, यांसारख्या काही कारणांमुळे सुरुवातीला घरच्यांचा नकार होता
उजमा शेख
पुणे: जेव्हा २०१९ बॅचमध्ये महिला एसटी चालक म्हणून निवड झाली. तेव्हा धाडसी व्यक्तिमत्त्व, जबाबदारीचे काम असल्यामुळे तसेच ५० लोकांचे जीव हातात, काही बो-वाईट झाले तर यांसारख्या काही कारणांमुळे सुरुवातीला घरच्यांचा नकार होता, परंतु एसटी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते, त्यामुळे हळूहळू घरच्यांचा विश्वास बसू लागला, असे महिला एसटीचालक शीतल शिंदे यांनी सांगितले.
राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी लोकांची पहिली पसंती असते ती लाल परीची, त्याचे स्टेअरिंग आता अवघ्या २६ वर्षीय शीतल शिंदे यांच्या हाती आले आहे. बारावीत एअर होस्टेज म्हणून निवड झाली. त्या एमसीए पदवीधारक असून, त्यांनी खाजगी बँकेत नोकरी केली. पण कोणत्याही नोकरीत त्यांना समाधान मिळाले नाही; त्यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा दिल्या. त्याच काळात त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात बघितली. त्यानुसार सर्व प्रक्रिया सुरू केल्या. २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पात्रता चाचणीत उत्तीर्ण होऊन २६ वर्षी शीतल शिंदेच्या हाती आले लाल परीचे स्टेअरिंग. जिद्द, चिकाटी, प्रयत्न त्याला संघर्षाची जोड देऊन महिला कोणत्याही क्षेत्रातील काम सक्षमपणे पूर्ण करू शकतात, त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे महिला एसटीचालक शीतल शिंदे आहेत.
पहिले स्टेअरिंग पुणे-सिंहगड किल्ला मार्गावर!
सुरुवातीला दीड हजार किलोमीटर एसटी प्रशिक्षण देण्यात आले. महिला चालक २०१९ मध्ये सेवेत रुजू होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनामुळे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर महामंडळाने महिलांना दिलेल्या प्रशिक्षणादरम्यान वळण मार्गावर प्रशिक्षण, घाट चढणे, वळण घेणे, गर्दीतून एसटी चालवण्याचे, रात्रीच्या वेळेस येणारे अडथळे, राष्ट्रीय महामार्गावरील प्रशिक्षण या सर्वांचे प्रशिक्षण देण्यात आले. जुलै २०२४ मध्ये शीतल शिंदे यांच्या हाती पुणे ते सिंहगड किल्ला असे पहिले लालपरीचे स्टेअरिंग देण्यात आले. गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्या महिला एसटीचालक म्हणून पुण्यात कामावर रुजू आहेत, तसेच महाराष्ट्रामध्ये सोलापूर ते पंढरपूर, धाराशिव, तुळजापूर येथे एसटी चालवित असल्याचे त्यांनी सांगितले.
मला माझी एक वेगळी ओळख निर्माण करायची होती. मी अनेक ठिकाणी काम केले; पण मनाला समाधान वाटले नाही, एक महिला बसचालक म्हणून प्रत्येक व्यक्तीचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे, गाव पातळीवर लोकांकडून सत्कार केला जातो, प्रवासांकडून सेल्फी काढली जाते, एक महिला बसचालक म्हणून मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे निभावते, याचा मला अभिमान आहे. - शीतल शिंदे, महिला एसटीचालक