खासगी विद्यापीठांच्या शुल्कातही आता ५० टक्के सवलत; EWS प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 10:43 AM2023-06-24T10:43:30+5:302023-06-24T10:44:35+5:30

खासगी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे...

50 percent discount in private university fees now; Benefits to EWS category students | खासगी विद्यापीठांच्या शुल्कातही आता ५० टक्के सवलत; EWS प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

खासगी विद्यापीठांच्या शुल्कातही आता ५० टक्के सवलत; EWS प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

googlenewsNext

पुणे : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत मिळणार आहे. तसा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावरील यादीत राज्यात २५ खासगी विद्यापीठे असून, त्यातील १४ विद्यापीठे पुण्यातील आहेत. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ हाेणार आहे.

राज्य शासनाकडून खासगी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काेणत्याही शैक्षणिक सवलती देण्यात येत नाहीत. खासगी विद्यापीठात अभ्यासक्रमांसाठी माेठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेताना शुल्क भरणे कठीण जाते. या पार्श्वभूमीवर खासगी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, राज्यात २५ खासगी विद्यापीठे आहेत. या सर्व विद्यापीठांना शासनाचा निर्णय लागू होणार आहे. त्यापैकी पुण्यात सर्वाधिक १४ विद्यापीठे आहेत. तसेच राज्यातील मुंबई ५, कोल्हापूर २ तसेच नाशिक, रायगड, औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये प्रत्येकी एक विद्यापीठ आहे.

राज्यातील स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संख्येच्या एकूण १० टक्के विद्यार्थ्यांसाठी, जे शासनाच्या निकषानुसार आर्थिक दुर्बल आहेत, अशा विद्यार्थ्यांना जात प्रवर्ग विचारात न घेता गुणवत्तेनुसार शैक्षणिक शुल्कामध्ये ५० टक्के सूट संबंधित स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठाकडून देण्यात येईल. याव्यतिरिक्त आर्थिक दुर्बल किंवा अन्य निकषांच्या आधारे उर्वरित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कातून सूट द्यावयाची असल्यास त्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यापीठाच्या स्तरावर घेण्यात येईल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

पुण्यातील खासगी विद्यापीठे :

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, फ्लेम विद्यापीठ, जे. एस. पी. एम. विद्यापीठ, एमआयटी आर्ट, डिझाइन ॲड. टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पिंपरी चिंचवड विद्यापीठ, स्पायसर ॲडव्हेन्टिस्ट विद्यापीठ, श्री बालाजी विद्यापीठ, सिम्बायोसीस स्किल्स ॲड. प्रोफेशनल विद्यापीठ, विश्वकर्मा विद्यापीठ आणि एनआयसीएमएआर विद्यापीठांचा समावेश आहे.

Web Title: 50 percent discount in private university fees now; Benefits to EWS category students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.