मसाप निवडणुकीसाठी ५० टक्के मतदान

By admin | Published: March 13, 2016 01:48 AM2016-03-13T01:48:21+5:302016-03-13T01:48:21+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत सुमारे ५,४८९ सभासदांनी मतदान केले. दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ११,३३६ मतदारांपैकी

50 percent voting for the Masap election | मसाप निवडणुकीसाठी ५० टक्के मतदान

मसाप निवडणुकीसाठी ५० टक्के मतदान

Next

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत सुमारे ५,४८९ सभासदांनी मतदान केले. दि. १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत ११,३३६ मतदारांपैकी अर्ध्याअधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बारकोड आणि ओळखपत्र या निकषांवर पात्र मतदार ठरविण्यात येणार असून, १५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर केले जातील, अशी माहिती या निवडणुकीचे मुख्य अधिकारी अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी (दि. १४) सायंकाळी ७ वाजेपर्यंत मसापच्या कार्यालयात मतपत्रिका स्वीकारण्यात येणार आहेत. दि. १५ रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजेपर्यंत अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल. शनिवारपर्यंत पुणे शहरातील २,९४८ मतदारांपैकी १,०६०, तर पुणे जिल्ह्यातील १,५९६ मतदारांपैकी ८७३ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरुवातीपासूनच दुबार नावे, बोगस मतदान, मृत व्यक्तींची नावे अशा विविध कारणांनी चर्चेत राहिली आहे. प्रारंभीचे काही दिवस थंड प्रतिसाद मिळाल्यानंतर सभासदांचा मतदानाचा ओघ हळूहळू वाढला. काही सभासदांना मतपत्रिका न मिळाल्याने त्यांनी दुबार मतपत्रिकांसाठी अर्ज केला होता. अर्ज केलेल्या ४१० पैकी ३५३ पात्र मतदारांना दुबार मतपत्रिका देण्यात आल्याचे परदेशी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मृत व्यक्तींच्या नावे अथवा बोगस मतदानाचे प्रमाण नगण्य असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. निवडणुकीसाठी परदेशी यांच्यासह अ‍ॅड. सुभाष किवडे, प्रा. सुधाकर जाधवर यांनी काम पाहिले. ठाणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये निवडणूक बिनविरोध पार पडली. पुणे शहर, पुणे जिल्हा, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, कोकण या विभागांमध्ये मतदान प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
यंदाच्या निवडणुकीसाठी बारकोड पद्धती, ओळखपत्राची सक्ती, या पद्धतीने राबविल्याने मतदारांनी समाधान व्यक्त केले.
>प्रथमच बारकोड
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रथमच बारकोड पद्धत वापरण्यात आली आहे. मतमोजणीदरम्यान सुरुवातीला बारकोड मॅच करणे आणि ओळखपत्रे तपासणे या निकषांवर पडताळणी होणार आहे.
सुरुवातीचा तास-दीड तास ही पडताळणी झाल्यानंतर पात्र मतपत्रिकांच्या प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात होईल. ओळखपत्र नसलेल्या, मृत व्यक्तींच्या नावाने आलेल्या तसेच चारही बाजूंनी चिकटपट्टी लावलेल्या मतपत्रिका बाद ठरविल्या जाणार आहेत. त्यामुळे बोगस मतदानाचे प्रमाण नगण्य असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मतपत्रिकांबाबत आतापर्यंत झालेले घोळ लक्षात आणून दिले असता, इतक्या वर्षांच्या सवयी कशा बदलणार, असा सवाल करून त्यांनी कोपरखळी मारली.
बोगस मतदानाला आळा घातला जावा, यासाठी मतदान प्रक्रिया आणखी पारदर्शी करण्याकडे लक्ष देण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. डॉ. न. म. जोशी यांच्या नावाने बोगस मतदान झाल्याने मसाप निवडणूक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना याबाबतची अधिक माहिती निकालादिवशी देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: 50 percent voting for the Masap election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.