येरवड्यात कोरोनाबाधित मुलांसाठी स्वतंत्र ५० बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:00+5:302021-05-06T04:12:00+5:30
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पालिकेने तयारीला सुरुवात केली असून, खाटांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. दुसऱ्या ...
पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पालिकेने तयारीला सुरुवात केली असून, खाटांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढले आहे. तिसऱ्या लाटेत जे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात मुलांसाठी स्वतंत्र ५० खाटांचे कोविड रुग्णालय तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता बालरोग तज्ज्ञांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त रुग्णांना बसला. तर, दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्गावरही कोरोनाच्या घाला घातला. दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधण्यात केंद्र, राज्य शासनापासून स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वच यंत्रणा कमी पडल्या. त्यामुळे सध्या खाटांपासून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर खाटा कमी पडू लागल्या. रेमडेसिविर व अन्य औषधांची मोठ्याप्रमाणावर चणचण भासू लागली. त्यातच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेमध्ये कोरोना विषाणूचे म्युटंट अधिक परिणामकारक राहील आणि याचा संसर्ग लहान मुलांमध्येही पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
------
लहान बालकांपासून १० वर्षे वयाच्या मुलांच्या घशात असलेल्या थायमस ग्रंथीमुळे बऱ्यापैकी प्रतिकारशक्ती असते. परंतु १८ वर्षांखालील प्रामुख्याने १० ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनाशी लढा देणारी प्रतिकारशक्ती वाढविण्यासंदर्भात अद्याप लस किंवा औषध नाही. या गटातील मुलांना संसर्ग झाल्यास विदारक स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-----
पालिकेने पहिल्या दिवसापासून कोरोनाविरोधात लढा दिला आहे. आरोग्य सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तिसऱ्या संभाव्य लाटेचा विचार करून तसेच तज्ज्ञांची मते घेऊन लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्यांच्यावरील उपचारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र ५० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार आहे.
- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
-----
१. मुलांचे पालकही पॉझिटिव्ह असतील, तर त्यांच्यावरही याच ठिकाणी उपचार करणार.
२. पालिकेकडे सध्या ९ बालरोग तज्ज्ञ आहेत. आणखी ९ बालरोग तज्ज्ञ नेमण्याची कार्यवाही सुरू.
३. पालिकेने यापूर्वी कोरोनाबाधित महिलांच्या प्रसूतिसाठी सोनावणे हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र व्यवस्था केली.
-----
कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना अधिक धोका असेल असा अंदाज टास्क फोर्सकडून वर्तविण्यात आला आहे. हे लक्षात घेऊन येरवडा राजीव गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र ५९ बेडची व्यवस्था करावी यासाठी आमदार निधी दिला आहे. भविष्यात राजीव गांधी रुग्णालय हे सर्व सुविधांयुक्त मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय करण्यात येईल.
- सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी