अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना ५० हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:58 AM2018-07-25T00:58:34+5:302018-07-25T00:59:00+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये, विभाग व संस्थांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशासनाकडून अपघात विमा उतरविण्यात आला आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालये, विभाग व संस्थांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशासनाकडून अपघात विमा उतरविण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्याचा अपघात होऊन तो जखमी झाल्यास त्याला ५० हजारांची, कायमचे अपंगत्व आल्यास १ लाखाची मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर, अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना १ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संलग्नित महाविद्यालयांसाठी ही अपघात विमा योजना राबविली जात आहे. अपघात योजनेचा आढावा घेण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, वित्त व लेखा अधिकारी विद्या गारगोटे, आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांची समिती गठित करण्यात आली होती.
या समितीने सद्य:स्थितीमध्ये वैद्यकीय खर्चाचा विचार करता विद्यार्थ्यांना औषधोपचारांच्या विमा रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचा ५ हजार रुपयांचा विमा उतरविला जात होता. त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.