PMC | पुणे महापालिकेत मिळणार ५० तृतीयपंथीयांना नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 12:06 PM2023-02-17T12:06:01+5:302023-02-17T12:07:09+5:30
तृतीय पंथीयांना महापालिका सेवेत घ्यावी अशी मागणी सामाजिक संघटनांनी महापालिकेकडे केली होती....
पुणे : महापालिकेनेही तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, महापालिका सेवेत ५० तृतीय पंथीयांना महापालिकेच्या सेवेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात २८ जणांना कामावर घेतले जाणार असून, याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या सुरक्षा विभागाने तयार केला आहे.
तृतीय पंथीयांना महापालिका सेवेत घ्यावी अशी मागणी सामाजिक संघटनांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार सामाजिक बांधिलकीतून महापालिकाही तृतीय पंथीयांना नोकरी देणार असून, त्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांसमोर ठेवण्यात येणार आहे.
कंत्राटी पद्धतीने ५० तृतीय पंथीयांना कामावर घेतले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने त्यांच्यासाठी स्वतंत्र मूलभूत सुविधादेखील तयार केल्या आहेत. यामध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह, आदींचा समावेश आहे. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनादेखील त्यांच्यासोबत सौहार्दाचे, सलोख्याने वागण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २८ जणांना कामावर घेतले जाणार असून, त्यांना उद्यान विभाग, हॉस्पिटल आणि अतिक्रमण विभागात काम दिले जाणार आहे.