Ashadhi Wari: पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ५ हजार पोलीस; ठिकठिकाणी सीसीटीव्ही, टाॅवरद्वारे ‘वॉच’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:30 AM2024-06-27T10:30:13+5:302024-06-27T10:33:45+5:30

काही पोलीस कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशात सहभागी होणार

5,000 police for Palkhi ceremony in Pune CCTV everywhere watch through towers | Ashadhi Wari: पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ५ हजार पोलीस; ठिकठिकाणी सीसीटीव्ही, टाॅवरद्वारे ‘वॉच’

Ashadhi Wari: पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ५ हजार पोलीस; ठिकठिकाणी सीसीटीव्ही, टाॅवरद्वारे ‘वॉच’

पुणे: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) आणि जगद्गुरू तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi) यांचे पालखी सोहळे रविवारी (दि. ३०) शहरात दाखल होणार आहेत. ३० जून आणि १ जुलै रोजी दोन्ही पालख्या मुक्कामी राहणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार असून शहरात सुमारे ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त (Pune Police) तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही आणि वॉच टॉवरद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त घालणार आहेत. (Ashadhi Wari) 

श्रीक्षेत्र देहू येथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. २८) प्रस्थान होणार आहे. तर, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी (दि. २९) प्रस्थान होणार आहे. रविवारी (दि. ३०) दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होतील. पालखी सोहळा रविवारी आणि सोमवारी शहरात मुक्कामी असणार असून मंगळवारी (दि. २५) पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होणार आहे. नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. भवानी पेठेतील विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली असून सुमारे ५ हजार पोलिसांचा फाैजफाटा शहरात बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे.

रविवारी (दि. ३०) पालखीसोबत लाखो भाविक शहरात मुक्कामी असणार असून मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. ठिकठिकाणी वॉच टॉवर, सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. पालख्यांचे शहरात आगमन होण्यापासून पालख्या शहराबाहेर मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीच्या नियोजनासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

असा असेल बंदोबस्त...

अप्पर पोलिस आयुक्त - २
पोलिस उपायुक्त - १०
सहायक पोलिस आयुक्त - २०
पोलिस निरीक्षक- १०१
सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक - ३४३
पोलिस कर्मचारी - ३ हजार ६९३
होमगार्ड - ८००
राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी

गुन्हे शाखेची खास पथके वारकऱ्यांच्या वेशात...

पालखी सोहळ्यातील गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे भाविकांकडील ऐवज चोरी करतात. सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके साध्या वेशात गस्त घालणार आहे. यावेळी काही कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशात सहभागी होणार आहेत.

Web Title: 5,000 police for Palkhi ceremony in Pune CCTV everywhere watch through towers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.