पंतप्रधान दौऱ्यासाठी ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त, स. प. महाविद्यालय पोलिसांच्या ताब्यात
By विवेक भुसे | Published: July 29, 2023 10:43 PM2023-07-29T22:43:52+5:302023-07-29T22:44:33+5:30
फोर्सवन, एसआरपीएफ पथके तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी मुख्य कार्यक्रमाचे ठिकाणी असलेल्या स. प. महाविद्यालयाचा ताबा घेताना आहे. शनिवारी संपूर्ण दौऱ्यातील ठिकाणाची पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजीच्या (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) पथकाने शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. स. प. महाविद्यालयात सर्व पोलिसांना दौऱ्यातील बंदोबस्ताची माहिती देण्यात आली. पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम स्थळाचा परिसर नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटनदेखील होणार आहे. एसपीजीच्या पथकाने पंतप्रधान उतरणार असलेले हेलीपॅड, त्यांचे कार्यक्रम होणारी ठिकाणे, त्याचबरोबर त्यांचा ताफा जाणारे रस्ते याची पाहणी केली. त्यानंतर दौर्याचे काम पाहणार्या सर्व प्रशासकीय यंत्रणांची एकत्रित बैठक घेतली.
मोदी याचा हा एकदिवशीय दौरा असणार असून, विमानाने ते लोहगाव येथील हवाई दलाच्या टेक्नीकल एअरपोर्ट येथे येतील. त्यानंतर ते हेलिकॉफ्टरने शिवाजीनगर (सिंचननगर) येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पोहचतील. पुढे ते वाहनाने रस्तेमार्गे सर्व नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
एसआरपीएफ, फोर्सवनची पथके तैनात
पंतप्रधानांच्या दौर्यासाठी शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) तीन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर फोर्स वनची पथके देखील सुरक्षेसाठी असणार आहेत. रस्ते बंदोबस्त आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना तैनात करण्यात येणार आहे. तर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजीचे जवान असणार आहेत.
दहशतवादी कृत्य करण्याच्या इराद्याने पुण्यात वास्तव्य करीत असलेल्या दोघा दहशतवाद्यांना पोलिसांनी नुकतेच पकडले. त्याचवेळी एनआयएने डॉ. अलनान अली सरकार यालाही अटक केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दौऱ्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.