सौरउर्जेपासून पुणे विभागात ५०१ मेगावॅट वीज; पुणे जिल्हा आघाडीवर
By नितीन चौधरी | Published: October 16, 2023 04:01 PM2023-10-16T16:01:14+5:302023-10-16T16:01:37+5:30
केंद्र सरकारने राज्याला दिलेलेे १०० मेगावॅटचे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधीच पूर्ण केले
पुणे : पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेत आतापर्यंत २४ हजार ३८७ कार्यान्वित झालेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांमधून ५०१ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. यात पुणे जिल्ह्यात १२ हजार ८७६ ग्राहकांनी ३१६.२ मेगावॅट वीज निर्मिती होत असून ३ हजार ८८५ घरगुती व सोसायट्यांनी १७ मेगावॅटचे प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्र सरकारने राज्याला दिलेलेे १०० मेगावॅटचे उद्दिष्ट महावितरणने चार महिने आधीच पूर्ण केले आहे.
छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेमध्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी अनुदान देण्यात येते. सौर प्रकल्प उभारणीचा खर्च चार ते पाच वर्षांमध्ये भरून निघतो व त्याचा पुढे सुमारे २५ वर्षे लाभ होतो. सोबतच सौर प्रकल्पाच्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून संबंधित ग्राहकाच्या वीजबिलात समायोजित केली जाते. त्याचा मोठा आर्थिक फायदा ग्राहकांना होत आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.
विभागात पुणे जिल्हा आघाडीवर
गेल्या दीड वर्षांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ३ हजार ८८५ घरगुती ग्राहकांनी छतावर तब्बल १७.०४ मेगावॅट (१७ हजार ४७ किलोवॅट) क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत. या वीजनिर्मितीमध्ये आतापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीमध्ये पुणे जिल्ह्यात १२ हजार ८७६ ग्राहकांनी ३१६.२ मेगावॅट, सातारा जिल्ह्यात १९४४ ग्राहकांनी ३९.९ मेगावॅट, सोलापूरमध्ये ३३९४ ग्राहकांनी ५१.२ मेगावॅट, कोल्हापूरमध्ये ४००२ ग्राहकांनी ६३.३ मेगावॅट आणि सांगली जिल्ह्यातील २१७१ ग्राहकांनी ३०.२ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प छतावर कार्यान्वित केले आहेत. सद्यस्थितीत या पाचही जिल्ह्यांमध्ये १४४ ठिकाणी १.९ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणीचे काम सुरु असून १९४१ ठिकाणी ३१.४ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यासाठी तांत्रिक व्यवहार्यतेची तपासणी सुरू आहे. बिगर अनुदानामध्ये २९ हजार ५०२ घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांनी ४८४ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत.
असे मिळते अनुदान
घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येत आहे. तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान देण्यात येत आहे. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी ऑनलाइन अर्ज, एजन्सीजची व इतर सर्व माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर तसेच www.mahadiscom.in/ismart या स्वतंत्र पोर्टलवर उपलब्ध आहे.