दोन वर्षांत ५०६ जणांचा मृत्यू
By admin | Published: April 11, 2016 12:51 AM2016-04-11T00:51:49+5:302016-04-11T00:51:49+5:30
दुचाकी चालविताना कायद्याने सक्ती असलेल्या हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष करणे पुणे शहरातील युवावर्गाला चांगलेच महागात पडत आहे.
पुणे : दुचाकी चालविताना कायद्याने सक्ती असलेल्या हेल्मेटच्या वापराकडे दुर्लक्ष करणे पुणे शहरातील युवावर्गाला चांगलेच महागात पडत आहे. गेल्या दोन वर्षांत (जानेवारी २0१४ ते डिसेंबर २0१५ या कालावधीत) पुणे शहरात तब्बल ५0६ दुचाकीचालकांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या मृत्युमुखी पडलेल्या चालकांमध्ये सर्वाधिक ९0 टक्के युवक आहेत, तर १0 टक्क्यांमध्ये प्रौढ व्यक्ती तसेच महिलांचा समावेश आहे. तर या दोन वर्षांत अपघातांमध्ये हेल्मेट घातल्यानंतरही २ जणांना आपला प्राण गमवावा लागला असून, हेल्मेट असतानाही डोक्यावरून अवजड वाहनांचे चाक गेल्याने या दोन्ही दुचाकीचालकांचे प्राण गेलेले आहेत.
शहरात गेल्या दशकभरात दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, हा आकडा २५ लाखांच्या वर गेला आहे. तर दर वर्षी जवळपास दोन लाख नवीन वाहनांची नोंदणी होत आहे. त्या प्रमाणात शहरात दुचाकी चालविणाऱ्यांकडून हेल्मेट घालणाऱ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात पुणे शहरात दुचाकींचे जवळपास ८00 हून अधिक गंभीर अपघात झाले आहेत. त्यात सुमारे ५0६ चालकांनी आपले जीव गमावले आहेत. या चालकांनी हेल्मेट घातले नसल्याची नोंद आहे. तर यामध्ये सुमारे ९0 टक्के २१ ते ३५ या वयोगटातील युवक आहेत.