शिवराज्याभिषेक दिनाला शनिवारवाड्यावर उभारणार ५१ फुट स्वराज्यगुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:18 PM2018-06-04T13:18:10+5:302018-06-04T13:18:10+5:30
श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्य ध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभी राहणार आहे.
पुणे : शिवजयंती महोत्सव समितीतर्फे ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन ६ जून रोजी ५१ फूट उंच स्वराज्यगुढी उभारुन साजरा करण्यात येणार आहे. शनिवारवाडयाच्या प्रांगणात तब्बल ३५१ ढोल-ताशांच्या निनादात हा सोहळा होणार आहे. महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, चित्रपट कलाकार, सरदार, सुभेदार, मावळ्यांच्या वंशजांच्या शुभहस्ते स्वराज्यगुढीचे पूजन होणार आहे , अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.
श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप, शिवमुद्रा, सुवर्णहोन, वाघनखे आणि जगदंब तलवार या पाच शुभचिन्हांनी अलंकृत भगव्या स्वराज्य ध्वजासह ही स्वराज्यगुढी दिमाखात उभी राहणार आहे. याप्रसंगी शिवगर्जना, सह्याद्रीगर्जना, जय शिवराय, आम्ही नुमवीय, नादब्रह्म ट्रस्ट ,रुद्रगर्जना, गुरुजी, शिवनेरी, ही पुण्यातील नामांकित ढोलताशा पथके वादनात सहभागी होणार आहेत. पुण्यातील शिवाजी मर्दानी आखाडातर्फे शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर होणार आहे. श्री शिवछत्रपतींची आरती उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते होणार आहे.
यावर्षी समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध संघटना, संस्थांच्या मार्फत दुर्गदुर्गेश्वर रायगड, लालमहाल, संभाजी महाराज पुतळा डेक्कन, नरवीर तानाजी मालुसरे चौक कोंढवा, चंद्रमौलेश्वर मंदिर हडपसर, वारजे चौक, नळस्टॉप चौक, १५ आॅगस्ट चौक, शिवणे गाव, नांदेड गाव, वीर बाजी पासलकर स्मारक, खेड-शिवापूर अशा असंख्य ठिकाणी चौकाचौकात, गावागावात स्वराज्यगुढी उभारत शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे. समितीच्या वतीने दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे साजरा होणा-या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रणवाद्य, सह्याद्रीगर्जना ही नामांकित ढोलताशा पथकेही मानवंदना देणार आहेत.