शनिवारवाड्यावर उभारणार ५१ फुटी स्वराज्य गुढी
By admin | Published: June 3, 2016 12:46 AM2016-06-03T00:46:40+5:302016-06-03T00:46:40+5:30
शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दर वर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतो. याही वर्षी ३४३वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी ५१ फुटांची स्वराज्य गुढी उभारण्यात येणार आहे.
पुणे : शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दर वर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतो. याही वर्षी ३४३वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी ५१ फुटांची स्वराज्य गुढी उभारण्यात येणार आहे. ही गुढी ६ जून रोजी सकाळी ९ वाजता शनिवारवाडा प्रांगणात उभारण्यात येईल. तसेच, ही स्वराज्य गुढी उभारताना ३४३ ढोलताशा पथके ढोलताशांच्या वादनाची मानवंदना देणार आहेत व ही नववर्षाची स्वराज्य गुढी लालमहाल, डेक्कन, १५ आॅगस्ट चौक अशा विविध १०० ठिकाणी उभारण्यात येईल.
या वेळी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महापौर प्रशांत जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके व स्वराज्य परिवारांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून गुढी उभारण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक-अध्यक्ष अमित गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी रायगडावरील गंगासागर जलाशयातील पवित्र जलाने श्री शिवछत्रपतींचा पाद्यजलाभिषेक घातला जाणार असून कमंडलूत भरून हे जल उपस्थितांना वाटण्यात येणार आहे. याचबरोबर, ६ जून रोजी पहाटे रायगडावरील नगारखान्यासमोर युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते भगवा ध्वज उभारून राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याची सुरुवात होणार आहे. रणवाद्य हलगी, घुमक व कैताळाच्या कडकडाटात होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके होणार आहेत. यावेळी रणवाद्ये, सह्याद्री गर्जना ही पुण्यातील नामांकित पथके रायगडावरील राजसदरेसमोर वादन करणार आहेत.
परिषदेत सार्वजनिक स्वराज्य गुढी उभारण्यासाठी स्वराज्य ध्वजाचे वाटप डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते उपस्थितांना करण्यात आले.