ऑनलाइन व्हायवामुळे ५११ विद्यार्थ्यांनी पीएचडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:13 AM2021-03-26T04:13:06+5:302021-03-26T04:13:06+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्राच्या माध्यमातून पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते.त्यात ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्राच्या माध्यमातून पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते.त्यात विद्यार्थ्यांच्या संशोधनाची माहिती अद्ययावत ठेवणे, विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस रिपोर्ट, पुनर्नावनोंदणी अर्ज, गोषवारा, प्रबंध यांचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शोधप्रबंध जमा केल्यानंतर त्या प्रबंधाची सद्यस्थिती काय आहे , याबाबतची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने पाहता येते. विद्यापीठाने यासंदर्भातील ट्रॅकिंग सिस्टिम तयार केली आहे.
कोरोना काळात पीएचडी प्रबंध सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने व्हायवा घेण्याच्या सूचना सर्व विद्याशाखांच्या संबंधित अधिका-यांना दिल्या. तसेच विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागातर्फे यासंदर्भातील सविस्तर कार्यपद्धती प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने व्हायवा घेतल्या जाणा-या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती पीएचडी ट्रेकिंग सिस्टीममध्ये अद्ययावत करण्याचे बंधन घालण्यात आले. परिणामी केवळ भारतातीलच नाही तर परदेशातील विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाइन पद्धतीने मौखिक परीक्षा देणे शक्य झाले. त्यामुळे शोधप्रबंध सादर केलेल्या ५२९ विद्यार्थ्यांपैकी ५११ ऑनलाइन पद्धतीने व्हायवा देऊन पीएचडी पदवी प्राप्त केली.
--------
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये ,या उद्देशाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने व्हायवा घेण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार केली. ऑनलाइन पद्धतीने व्हायवा देण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया कशी पूर्ण करावी, यासंदर्भातील सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे शोधप्रबंध सादर केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्हायवा देऊन पीएचडी मिळवली.
- उत्तम चव्हाण, उपकुलसचिव, शैक्षणिक प्रवेश विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-----
ऑनलाइन व्हायवा देणा-या विद्यार्थ्यांची विद्या शाखा निहाय आकडेवारी
विज्ञान आणि तंत्रज्ञान : २४३
वाणिज्य आणि व्यवस्थापन : ११०
मानवविज्ञान : २५
अंतर विद्या शाखीय अभ्यास :१३३