आरोग्याला रिक्त पदांची अवकळा, मान्य पदांपैकी ५१८ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 03:46 AM2018-05-27T03:46:16+5:302018-05-27T03:46:16+5:30

पुणे शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभागाची महत्त्वाची मानली जाते. मात्र, रिक्त पदांमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागालाच आपल्या कामाचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

518 posts vacant in the approved position | आरोग्याला रिक्त पदांची अवकळा, मान्य पदांपैकी ५१८ पदे रिक्त

आरोग्याला रिक्त पदांची अवकळा, मान्य पदांपैकी ५१८ पदे रिक्त

googlenewsNext

- विशाल शिर्के
पुणे - शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभागाची महत्त्वाची मानली जाते. मात्र, रिक्त पदांमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागालाच आपल्या कामाचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आरोग्य विभागाच्या मान्य जागांपैकी तब्बल ५१८ पदे रिक्त असल्याची माहिती हाती आली आहे. ही पदे तातडीने भरण्याची मागणी आरोग्य विभागाने महापालिकेकडे केली आहे. करार पद्धतीतील अल्प वेतनामुळे पदभरतीला प्रतिसाद मिळत नसल्याचेदेखील आरोग्य विभागाने महापालिकेला कळविले आहे.
आरोग्य खात्याच्या नियंत्रणाखालील रुग्णालयांमधील खाटांची (बेड) संख्या वाढविण्यात आली असून, अनेक वैद्यकीय विभागांच्या संख्येतदेखील वाढ करण्यात आली आहे. याशिवाय आरक्षित जागांमध्ये नव्याने सुरू करावयाची प्रसूतिगृहे, हेल्थ सेंटर, वस्ती क्लिनिक या ठिकाणी वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीच्या पदांची आवश्यकता आहे. याबाबत महापालिकेला कळवूनदेखील पालिकेने त्यावर कोणताच ठोस निर्णय घेतलेला नाही. आरोग्य विभागासाठी वर्ग एक ते चार या श्रेणीतील १ हजार ६६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५१८ पदे रिक्त आहेत. ही संख्या मंजूर पदांच्या तब्बल ३१ टक्के इतकी होते. या सर्वबाबींसह आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी पत्राद्वारे महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती समोर आणली आहे.
आरोग्य विभागाकडील सर्व दवाखाने, प्रसूतिगृह, रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यासाठी तसेच नवजात अतिदक्षता विभाग सुरू करण्याकरिता श्रेणी एक ते चार या संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. अन्यथा शहरातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणे अडचणीचे ठरणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. साबणे यांनी नमूद केले आहे. रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविणे अवघड होईल, असेही पत्रात म्हटले आहे.

एमबीबीएस बजावतात
स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका
महापालिकेकडे १८ प्रसूतीगृहे आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी त्यांचे कामकाज एमबीबीएस पदाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करावे लागते. येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात २२ मार्च २०१८ रोजी गंभीर परिस्थितीतील महिला रुग्ण दाखल झाली होती. अशा वेळी स्त्रीरोगतज्ज्ञांच्या अभावी एमबीबीएस वैद्यकीय अधिकाºयांकडून कामकाज करावे लागले. त्यामुळे अडचणी निर्माण होऊन अप्रिय घटनादेखील घडली आहे, अशा अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेच्या प्रसूतीगृहामध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ असणे अत्यंत आवश्यक असल्याचा अभिप्राय महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी पत्रात नोंदविला आहे.

वेतनश्रेणीमुळे तज्ज्ञ
डॉक्टर फिरकेनात
विशिष्ट विषयातील तज्ज्ञ डॉक्टर्सना पुरेशी वेतनश्री मिळत नसल्याने ते महापालिकेच्या सेवेकडे पाठ फिरवित आहेत. सध्या एमबीबीएससाठी ६० ते ७० हजार रुपये महिना वेतन देण्यात येते. मात्र, त्याच वेतनात बालरोग, स्त्रीरोग, नवजात अर्भकतज्ज्ञ अथवा सुपरस्पेशालिटी डॉक्टर तयार होत नाहीत. त्यामुळे सेवेतील अथवा सेवेत येणाºया एमबीबीएस डॉक्टर्सला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहन दिले जाते, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाºयांनी दिली.

आयसीयू फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, नेत्रशल्यचिकित्सक, जीवशास्त्रतज्ज्ञ, तंत्रज्ञ हृदयरोग, नवजात अर्भकतज्ज्ञ, कनिष्ठ प्रयोगशाळातज्ज्ञ, निरीक्षक हिवताप, कीटक संघटक, शस्त्रक्रियागृहातील सहायक अशा विविध २० संवर्गातील पदे रिक्त आहेत.

Web Title: 518 posts vacant in the approved position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.