‘भीमा-पाटस’ला ५२ अर्ज अवैध
By admin | Published: April 28, 2015 11:30 PM2015-04-28T23:30:26+5:302015-04-28T23:30:26+5:30
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ३३0 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
दौंड : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ३३0 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, छाननीअंतर्गत ५२ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या नियमानुसार २८-२ या कलमाच्या आधारे पिकवलेला संपूर्ण ऊस निवडणूकपूर्वीच्या पाच गळीत हंगामांपैकी लगतच्या सलग ३ हंगामांत कारखान्याला घालण्याचे बंधन ज्यांनी पाळले नाही, अशा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.
उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी होती; परंतु ६२ अर्जांवर हरकती घेतल्यामुळे छाननी आणि निर्णय देण्यास विलंब झाला. दरम्यान, हरकत घेतलेल्या अर्जांवर मंगळवारी दुपारी सुनावणी झाली. यात मान्यवरांचे अर्ज बाद झाले आहेत.
(वार्ताहर)
मान्यवरांचे अर्ज बाद
४भीमा-पाटस कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार राहुल कुल गटाच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्रित पॅनल करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली. परंतु या पॅनलचे प्रमुख आणि भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्त्वशील शितोळे यांचाच अर्ज बाद केल्यामुळे भीमा-पाटसच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता.
४दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब ढमढेरे, माजी पंचायत समिती सदस्य दौलत ठोंबरे, माजी पंचायत समिती सदस्य बबन रणवरे, पाटसचे माजी सरपंच योगेंद्र शितोळे, माणिकराव भागवत, शहाजी चव्हाण, नारायण आटोळे, शहाजी अवचर, नानासाहेब जेधे, अशोक खळदकर, वरवंडचे माजी सरपंच रामदास दिवेकर, सुभाष बोत्रे, विठ्ठल थोरात यांच्यासह मान्यवरांचे अर्ज अवैध झालेले आहेत.
४विरोधकांचे राजकीय दबावापोटी जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद करण्यात आला असल्याचा आरोप भीमा-पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्त्वशील शितोळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
४दरम्यान, या निकालाच्या विरोधात साखर सहसंचालकाकडे तक्रार करण्यात येणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी निवडणुकीला घाबरून विरोधकांचे अर्ज रद्द करण्याचे षड्यंत्र रचले असल्याचे स्पष्ट करून शितोळे म्हणाले की, सभासदांना भाव नाही तर कामगारांना पगार नाही, अशा दुहेरी कचाट्यात राहुल कुल अडकलेले असून, निवडणुकीत जनता त्यांच्या बाजूने कौल देईल की नाही याबाबत त्यांना साशंकता आहे. त्यामुळे कुल यांनी राजकीय वापर करून विरोधकांचे अर्ज बाद केले. वास्तविक पाहता मी कारखान्याला सलग तीन वर्षे ऊस दिला आहे.
४यासंदर्भातील दाखला कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी मला दिलेला आहे. गट क्र. ५४ वरून माझ्या अर्जावर हरकत घेण्यात आली. त्या गटात चुकीच्या पद्धतीने गुऱ्हाळ दाखविण्यात आले आहे. ही चूक मी कारखाना व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर या गटातील ऊस चाऱ्यासाठी दिल्याच्या कारणावरून माझा अर्ज बाद केला आहे. तेव्हा कारखान्याने एफआरपी दिलेली नाही. यासंदर्भात लवकरच भीमा पाटसवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.