शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ५२ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 01:48 PM2024-11-17T13:48:14+5:302024-11-17T13:49:58+5:30
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ५२ लाख ७७ हजारांचा आर्थिक गंडा घातला ...
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी ५२ लाख ७७ हजारांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी, कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उंड्री येथील राम कुमार (६३) यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी ३६ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फिर्यादी घरी असताना, सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आशयाची जाहिरात पाठवली. त्यानंतर फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना एक ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. पुढे त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे भरून घेतले. यानंतर त्यांना कोणतीच रक्कम परत करण्यात आली नाही.
दुसऱ्या घटनेत येवलेवाडी, कोंढवा येथील दत्तात्रय यादव गुळूमकर (५२) यांना देखील सायबर ठगांनी अशाच प्रकारे १६ लाख २५ हजारांचा आर्थिक गंडा घातला आहे. शेअर स्टाॅक आणि आयपीओ खरेदीच्या बहाण्याने त्यांना चांगला नफा मिळेल, असे प्रलोभन दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरात शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरटे नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहेत. मात्र, असे असताना देखील कोणत्याही प्रकारची खात्री न करता नागरिक देखील आपला पैसा सायबर चोरांच्या हवाली करत आहेत.
क्रेडिट कार्डच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक
क्रेडिट कार्डचे कॅश पाॅइंट संपत आल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी येवलेवाडी येथील श्रद्धा संदीप नारवेकर (४५) या महिलेची २ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फिर्यादींना एक ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यामध्ये त्यांच्या क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन पैसे काढून घेतले. याप्रकरणी, महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.