सारथीच्या मदतीने ५२ मराठा विद्यार्थी ‘यूपीएससी मेन’मध्ये उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:11 AM2021-04-01T04:11:04+5:302021-04-01T04:11:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठा व मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या विकासाच्या प्रमुख उद्देशाने स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या वतीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठा व मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या विकासाच्या प्रमुख उद्देशाने स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या वतीने मराठा समाजातील २३३ विद्यार्थ्यांनी जानेवारी २०२१ मध्ये यूपीएससीची (केंद्रीय लोकसेवा आयोग) मुख्य परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल २३ मार्चला जाहीर झाला असून, यात सारथीचे ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता एप्रिल व मे महिन्यांत विविध पदांसाठी मुलाखती होतील. ‘सारथी’च्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळावे म्हणून तयारी करून घेतली जात असल्याचे संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सांगितले.
याबाबत काकडे यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी सारथी संस्थेला निधी उपलब्ध करून दिला जातो. यातून ५२ विद्यार्थ्यांनी यूपीएससी मुख्य परीक्षेत यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांचा शेवटचा मुलाखतीचा टप्पा दिल्ली येथे एप्रिल व मेमध्ये पार पडणार आहे. यासाठी आर्थिक मदत व आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकारी व विषय तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण, मार्गदर्शन केले जाणार आहे. २७ मार्चला त्याचा पहिला टप्पा पार पडल्याचे काकडे यांनी सांगितले.