डेक्कन, इंद्रायणीसह ५२ रेल्वे चार दिवसांसाठी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:36+5:302021-07-24T04:09:36+5:30
पुणे : लोणावळा-कर्जत दरम्यानच्या घाटात अद्याप अपलाईनचे काम सुरू आहे, तसेच मागील काही दिवसांपासून रेल्वे रद्द झाल्याने रेक लिंक ...
पुणे : लोणावळा-कर्जत दरम्यानच्या घाटात अद्याप अपलाईनचे काम सुरू आहे, तसेच मागील काही दिवसांपासून रेल्वे रद्द झाल्याने रेक लिंक या विस्कळीत झाल्या आहेत. शिवाय मिरज-कोल्हापूर दरम्यान नद्यांचे पाणी धोकादायक पातळीच्या वर जात आहे. या सर्व कारणामुळे रेल्वे प्रशासनाने तब्बल ५२ रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला. यात डेक्कन एक्सप्रेस व इंद्रायणी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. शनिवार २४ ते मंगळवार २७ जुलैपर्यंत ह्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबई व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तसेच कोकण रेल्वे व दक्षिण मध्य रेल्वेत देखील काही ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहे.त्यामुळे काही गाड्या मध्य रेल्वेच्या क्षेत्रातून धावत आहे.
------------------
मध्य रेल्वेवर ताण म्हणून केल्या रद्द गाड्या
घाटातील दोन मार्गिका खुल्या झाल्या आहेत. त्यावर काही ठिकाणी कॉशन ऑर्डर लावण्यात आली आहेत. त्यामुळे वेगावर मर्यादा आल्या आहेत.
अजुनही एक मार्गिका वाहतुकीसाठी बंदच आहे. असे असताना अधिक गाड्या चालविणे हे मध्य रेल्वेवर ताण वाढणारी बाब आहे. शिवाय सतत वाढत असणाऱ्या पावसाने अनेक प्रवासी प्रवास करणे टाळत आहे. तेव्हा रिकाम्या गाडया चालविण्यापेक्षा रद्द करणे अधिक सोयीचे ठरत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
------------------------
या गाड्या केल्या रद्द
पुणे - अहमदाबाद, गदग - मुंबई, कोल्हापूर- मुंबई,पंढरपूर -मुंबई, अमरावती - मुंबई, हैदराबाद - मुंबई, पनवेल - नांदेड आदी प्रमुख गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.