व्यावसायिकाची २ महिलांविरोधात ५३ लाखांच्या अपहाराची तक्रार; तर महिलेची विनयभंगाची तक्रार
By नम्रता फडणीस | Published: September 15, 2022 05:48 PM2022-09-15T17:48:14+5:302022-09-15T17:48:27+5:30
बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या मुलावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला
पुणे : बांधकाम व्यावसायिकाने ५३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर लगेचच त्यातीलच एका महिला कर्मचाऱ्याने बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या मुलाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली आहे. त्यावरून बांधकाम व्यावसायिक आणि त्याच्या मुलावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.
दिलीप रिकबचंद ओसवाल (वय ५९, रा. बंडगार्डन) व मुलगा आकाश दिलीप ओसवाल (वय २९) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महावीर रिअल्टी या नावाने त्यांचा बांधकाम व्यवसाय आहे. या कंपनीने वाघोली येथे सिल्वर क्रिस्ट नावाचा प्रोजेक्ट उभारला होता. संबंधित महिला तिथे सेल्स एक्झिक्युटिव्ह येथे काम करीत होती. आरोपीने तिला वेळोवेळी अंगाला स्पर्श करून विनयभंग केला. कार्यालयाजवळ पडलेले कंडोम दाखवून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. आकाश ओसवाल यांनीदेखील अशाच प्रकारचे कृत्य करून फिर्यादी महिलेच्या जातीचा उल्लेख करीत तुम्ही आम्हाला खुश करण्यासाठीच असता असे बोलून अश्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, ओसवाल यांनी देखील या महिलेसह तिच्या सहकारी महिलेविरोधात ५३ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तक्रार दिली होती. ग्राहकांना रक्कम भरण्यास कार्यालयाकडून सांगण्यात आले, तेव्हा त्यांनी आम्ही पैसे भरल्याचे सांगितले, पण पैसे जमाच झाले नाहीत. त्यानंतर दोन्ही महिला कामावर आल्या नाहीत. त्यातील एका महिलेने बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिल्याची माहिती लोणीकंद ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली.