53 तोळे सोने लुटले, दोन आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 11:16 PM2017-12-22T23:16:37+5:302017-12-22T23:16:47+5:30
मुलाच्या केस संदर्भातील वकिलांनी दिलेली कागदपत्रे द्यायची आहेत असे सांगून अंगावरील तब्बल 53 तोळे सोने लुटण्याचा प्रकार उघडकीस आला.
पुणे : मुलाच्या केस संदर्भातील वकिलांनी दिलेली कागदपत्रे द्यायची आहेत असे सांगून अंगावरील तब्बल 53 तोळे सोने लुटण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सोलापूर जिल्हयातील दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चार चेन, तीन ब्रेसलेट, दोन अंगठ्या, विओ कंपनीचा मोबाईल असा 13 लाख 37 हजार 500 रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला
आहे.
या गुन्हयात पाच आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. रणजित आनंदराव कांबळे ( वय 25 वर्षे, रा. मु.पो भाळवणी, ता.पंढरपूर जि. सोलापूर) आणि सचिन हनुमंत कुरळे (रा.उघडेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हददीमध्ये गस्त घालत असताना दोन
व्यक्ती कात्रज बायपास चौकात थांबले आहेत आणि त्यांच्याकडे सोन्याचे दागिने असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले असता कांबळे यांच्या पँटच्या खिशात एक प्लँस्टिकची पिशवी आढळली त्यामध्ये 53 तोळ्याचे सोन्याचे दागिने सापडले. हे दोन आरोपी काही दिवसांपूर्वीच पुण्यात आले. फिर्यादी मुकेश शेलार यांची कर्वेनगर परिसरात ज्यूसची गाडी आहे, त्यांचा मुलगा एका खुनाच्या गुन्हयात येरवडा कारागृहात आहे. त्यामुळे मुलाच्या संदर्भातील वकिलांनी दिलेली कागदपत्रे द्यायची आहेत असे सांगून शेलार यांना पोतनीस परिसरात बोलावून आरोपी व त्यांचे साथीदार तेजस जाधव, रामभाऊ डावरे व त्याचा मित्र
यांनी मिळून त्याला एका गाडीत घातले आणि जबरदस्तीने पुणे बँगलोर हायवेवर नेऊन चाकूचा धाक दाखवित, मुलाला ठार मारण्याची धमकी देत लुबाडले. त्यानंतर फिर्यादीला खेड शिवापूर येथे सोडून दिले. शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी अशाप्रकारचे काही गुन्हे केले आहेत का? यासह फरारी आरोपीचा तपास चालू असल्याचे परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार वाघचवरे तसेच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डी आर मोहिते, कर्मचारी कृष्णा निढाळकर, चंद्रकांत फडतरे, प्रणव संकपाळ, उज्वल मोकाशी, अमोल पवार, गणेश चिंचकर, शिवदत्त गायकवाड, महेश मंडलीक, कुंदन शिंदे, अभिजित रत्नपारखी यांनी केली आहे.