जादा परताव्याचे आमिष पडले पावणेचार लाखाला!
By भाग्यश्री गिलडा | Published: October 11, 2023 05:02 PM2023-10-11T17:02:24+5:302023-10-11T17:02:37+5:30
प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार तरुणांकडून ३ लाख ७५ हजार रुपये उकळले
पुणे : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. याबाबत एका २६ वर्षीय तरुणाने गुरुवारी (दि. २१) फिर्याद दिली आहे. हा प्रकार २६ जुलै २०२३ ते रोजी घडला.
याबाबत प्रताप शिवन्ना (वय २६, रा. हडपसर) यांनी पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार तक्रारदार तरुणाला अनोळखी क्रमांकावरून पार्टटाइम नोकरी करण्यासाठी व्हाट्सअँपवर मेसेज आला. पार्टटाइम नोकरीसाठी सहमत असल्याचे सांगितल्यावर तरुणाला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करण्यात आले. वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार तरुणांकडून ३ लाख ७५ हजार रुपये उकळले. प्रत्यक्षात नफ्याचे पैसे काढायला गेल्यावर पैसे निघत नाही असे तरुणाच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केली असता आणखी पैसे भरण्याचा तगादा लावला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणणे तत्काळ कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी खुशबू सोनी आणि धीरज कुमार या टेलिग्राम आयडी धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक डगळे करत आहेत.