पुण्यात ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान; सर्वाधिक मतदान इंदापूरात, ग्रामीण भागात उत्साह टिकून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 07:14 PM2024-11-20T19:14:46+5:302024-11-20T19:15:39+5:30
आंबेगाव, इंदापूर, खेड आळंदी, दौंड, बारामती, मावळ, या ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह टिकून राहिला
पुणे : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. शहरी भागात ११ वाजेपर्यंत मतदानाला उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. तर ग्रामीण भागात ११ नंतर मतदानाच्या गतीला वेग आला. सकाळापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुण्यातील ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह दिसून आला आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक ६४.५० टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी विधानसभा मतदार संघात सर्वात कमी ४२.७२ टक्के मतदान झाले आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ५४.०९ टक्के मतदान झाले आहे.
अपेक्षेनुसार ग्रामीण भागात मतदानाचा उत्साह जाणवत असून शहरी भागात मात्र दुपारच्या वेळेत मतदान कमी झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात तीन वाजेपर्यंत ४१.७० टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. सर्वाधिक मतदान मावळ मतदारसंघात ४९.७५ टक्के झाले होते. मावळसह जुन्नर, आंबेगाव, इंदापूर मध्येही ४९ टक्क्यांच्या वर मतदान झाल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. शहरात मात्र अपेक्षेनुसारच दुपारच्या वेळेत मतदान कमी झाले. अखेरच्या टप्प्यात शहरी भागात मतदान वाढण्याची शक्यता आहे. पिंपरी मतदारसंघात सकाळपासूनच कमी मतदानाची नोंद होत असून दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान ३१.५८ टक्के मतदानाची नोंद झाली होती.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत टक्केवारी
आता मात्र इंदापूर मतदार संघाने आघाडी घेतली आहे. तर पिंपरी अजूनही कमीच मतदान झाले आहे. ग्रामीण भागात सकाळपासून मतदारांच्या रांगा नव्हत्या. मात्र, ११ नंतर रांगा दिसून आल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश मतदारसंघात चांगले मतदान झाले आहे. तर शहरी मतदारसंघात सुरुवातीला रांगा होत्या. तर त्यानंतर मतदारांनी कार्यालये गाठल्याने मतदानाचा टक्का कमी झाला आहे.