नटराजा,तुझ्या कृपेनेच आता रंगमंदिराचा पडदा लवकर उघडू दे! बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ व्या वर्धापन दिनाला कलाकारांचं साकडं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 12:56 PM2021-06-26T12:56:33+5:302021-06-26T12:59:12+5:30
बालगंधर्व रंगमंदिराचा ५४ वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा करण्यात आला.
पुणे: बालगंधर्व रंगमंदिर म्हणजे कलाकार मंडळी, नाट्यप्रेमी आणि पुणेकरांच्या अस्मितेचा विषय म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. आजवर सर्वांचं भरभरून प्रेम मिळालेल्या या रंगमंदिराचा आज वर्धापन दिसून आहे. दरवर्षी अतिशय उत्साहाने आणि विविध कलाकारांच्या आयोजनाने हा वर्धापन दिन साजरा केला जातो. मात्र, कोरोना संकटामुळे गेल्या एक ते सव्वा वर्षांपासून कलाकारांसह ह्या रंगमंदिराला देखील रसिकांच्या प्रेमाला मुकावे लागले आहे.मात्र आज वर्धापन दिनानिमित्त कलाकारांच्या उपस्थितीत यंदाच्या वर्षी साधेपणाने बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी बालगंधर्व रंग मंदिराचा पडदा उघडून त्याचे पूजन करण्यात आले. सर्वांनी नटराजाकडे लवकरात लवकर रंगमंदिरांचा पडदा उघडावा असं साकडे देखील घातलं.
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूमुळे सर्व परिस्थिती लक्षात घेऊन व शासनाच्या आदेशानुसार व सर्व नियमांचे पालन करत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचा ५४ वा वर्धापनदिन सोहळा यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरा झाला. यावेळी बालगंधर्व रंग मंदिराचा पडदा उघडून त्याचे पूजन करण्यात आले.तिथे रीतसर नारळ फोडण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले.हा पडदा लवकरच उघडावा यासाठी सर्वांनी नाटराजकडे साकडे घातले.तसेच सर्व कलाकारांनी नेहमीप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिन निमित्ताने केक कापून साजरा केला. बालगंधर्व परिवारातर्फे १५ वर्षांपासून बालगंधर्व रंग मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो. ३ दिवसांच्या या सोहळ्यात भावगीत ,भक्तीगीतापासून लावणीपर्यंत सर्व कला आविष्कार साजरे केले जातात.
या कार्यक्रमाला पुण्याचे उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले ,जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, जेष्ठ अभिनेत्री रजनी भट,अभिनेते विजय पटवर्धन, बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते,निर्माते दत्ता दळवी, शशी कोठावळे सुमित कॅसेट चे सुभाष परदेशी,कलाकेंद्राचे अशोक जाधव,अण्णा गुंजाळ,सुनील महाजन,जतीन पांडे, प्रकाश पायगुडे,योगेश देशमुख,योगेश सुपेकर नाट्य चित्रपट परिवारातील मोजकेच पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते.
उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी कलाकारांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवू व कलाकारांसाठी रंगमंच कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
मेघराज राजेभोसले म्हणाले,महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रिकामे गाळे गरजू कलाकारांना नाममात्र शुल्कात भाडे तत्वावर देण्यात यावे तसेच कलाकारांना शहरी गरीब योजनेचा थेट लाभ मिळावा तसेच छोटे खाणी स्वरुपात महानगर पालिकेच्या हद्दीत सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.