एसटीच्या ५५ बस ‘डब्बा’
By admin | Published: December 16, 2015 03:23 AM2015-12-16T03:23:13+5:302015-12-16T03:23:13+5:30
इंदापूर आगारातील ५ लाख किलोमीटरच्या पुढे ‘रनिंग’ झालेल्या गाड्यांची संख्या ५५ आहे. त्यामुळे बस बंद पडण्याचे सत्र सुरूच आहे.
अंथुर्णे : इंदापूर आगारातील ५ लाख किलोमीटरच्या पुढे ‘रनिंग’ झालेल्या गाड्यांची संख्या ५५ आहे. त्यामुळे बस बंद पडण्याचे सत्र सुरूच आहे.
सोमवारी (दि. १४) गोतोंडी येथील ५४ फाट्यानजीक झालेल्या अपघातानंतर इंदापूर आगार प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. मंगळवारी (दि. १५) सकाळी शेळगाव बसस्थानकानजीक व जाचकवस्ती अशा दोन ठिकाणी एसटी बस प्रवासादरम्यान बंद पडण्याचे प्रकार घडल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. सातत्याने घडणाऱ्या या प्रकारांमुळे एसटी बस कर्मचाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली.
मंगळवारी (दि. १५) सकाळी ११च्या दरम्यान इंदापूर-वालचंदनगर बस (एमएच १२-ई एफ, ६६७०) २५ ते ३० प्रवासी घेऊन वालचंदनगरच्या दिशेने निघाली असता, शेळगाव बस स्थानकानजीक इंजिनातून मोठा आवाज होऊन अचानक बंद पडली. दुपारी अडीचपर्यंत या गाडीच्या दुरुस्तीसाठी आगारामधून कर्मचारी आले नव्हते. इंदापूर-बारामती मार्गावरील जाचकवस्ती येथे बारामती-इंदापूर बस (एमएच १२-६४२१) हीदेखील इंजिनातून मोठा आवाज होऊन बंद पडली. ही घटना दुपारी तीन दरम्यान घडली. या बसमध्ये ५५ प्रवासी होते. अचानक बंद पडलेल्या बसमुळे प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागला. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांमधून तसेच एसटी कर्मचाऱ्यांमधूनही संताप व्यक्त होत आहे. बस आगारामधून बाहेर पडत असताना बसमध्ये काही बिघाड आहे का, याची व्यवस्थित तपासणी होत नसल्याने अशा या घटनांमुळे निदर्शनास येत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावरच आगार प्रशासन जागे होणार का, असा सवालही केला जात आहे. (वार्ताहर)
आगारप्रमुखाचे हात वर
कर्मचारीसंख्या कमी असल्याने सेवा देताना अडचणी येत आहेत. आगाराकडे ५ लाख किलोमीटरच्या पुढे ‘रनिंग’ झालेल्या गाड्यांची संख्या ५५ आहे. इंदापूर आगार सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने रोज या ठिकाणी येणाऱ्या इतर आगारांच्या बसना सेवा पुरवावी लागते. परिणामी, आमच्या आगाराच्या बसकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.
- एन. एस. मिले,
आगार व्यवस्थापक, इंदापूर