मामाच्या गावाला येणे पडले ५५ लाखांना! किराणा व्यावसायिकाच्या घरात चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 12:53 PM2022-11-15T12:53:16+5:302022-11-15T12:55:01+5:30
फुलगाव येथील किराणा व्यावसायिकाच्या घरातून लाखोंचा ऐवज चोरीला...
पुणे : मामाच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी पुण्यात आले असताना फुलगाव येथील किराणा व्यावसायिकाच्या घरातून चोरट्यांनी ५१ लाख रुपयांची रोकड आणि ३३ तोळे सोन्याचे दागिने असा ५५ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सतीश राका (वय ३१, रा. फुलगाव, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना १० ते १३ नोव्हेंबरदरम्यान घडली.
अधिक माहितीनुसार, सतीश राका यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय आहे. वडील, भाऊ आणि ते असे तिघेजण हा व्यवसाय पाहतात. पुण्यातील मामाची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना पाहण्यासाठी घरातील सर्वजण आले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोने-चांदीचे दागिने व रोकड असा तब्बल ५५ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून पळ काढला. घरफोडीची माहिती मिळताच त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
असा झाला उलगडा
फुलगाव शिवारातील एका व्यक्तीला त्यांच्या विहिरीत एक पिशवी सापडली. त्यात फिर्यादींच्या वडिलांचे ओळखपत्र आणि लाइट बिल मिळून आले. त्यानंतर त्यांनी फिर्यादींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्या दुसऱ्या नातेवाइकांना या पिशवीची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादींनी घरी येऊन पाहिले असता घरफोडी झाल्याचे लक्षात आले.