रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पातून ५.५ कोटी लिटर पाणी भूगर्भात
By admin | Published: June 15, 2017 05:00 AM2017-06-15T05:00:52+5:302017-06-15T05:00:52+5:30
लष्करातून कर्नलपदावरून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याच्या प्रयत्नांना महापालिकेने साथ दिल्यामुळे पालिकेच्या ७४ इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’प्रकल्प
- लक्ष्मण मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लष्करातून कर्नलपदावरून सेवानिवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याच्या प्रयत्नांना महापालिकेने साथ दिल्यामुळे पालिकेच्या ७४ इमारतींवर ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’प्रकल्प सुरू करण्यात आले असून, यंदाच्या पावसाळ्यात या इमारतींखालील भूगर्भात तब्बल साडेपाच कोटी लिटर पाणी जमा होईल. शासकीय इमारतींवर हे प्रकल्प राबवणारी पुणे महापालिका देशातील आणि राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
कर्नल (नि.) शशिकांत दळवी यांनी शहरातील शासकीय इमारती आणि सोसायट्यांच्या छतांवर हे प्रकल्प सुरू करण्याची मोहीम हाती घेतली असून मोबदला न घेता त्यांचे हे काम १५ वर्षांपासून सुरू आहे.
राज्यातील सर्व शासकीय व खासगी इमारतींवर ‘रुफ टॉप रेन हार्वेस्टिंग’ करण्याचे आदेश राज्य शासनाने फेब्रुवारी २००२मध्ये दिले होते. भूजलाच्या अति उपशामुळे आणि त्याचे योग्य प्रमाणात पुनर्भरण न झाल्यामुळे भूजलपातळी खालावली आहे. पुणे शहर पाण्यासाठी सर्वस्वी खडकवासला धरणावर अवलंबून आहे.
पुणे महापालिकेच्या जवळपास साडेतीनशे इमारती आहेत. या सर्व इमारतींवर हे प्रकल्प उभे राहिल्यास मोठ्या प्रमाणावर पाणी भूगर्भात जाऊ शकेल, हा विचार घेऊन त्यांनी पालिकेला प्रस्ताव दिला. १ जून २०१६ रोजी महापालिका आयुक्तांनी दळवी यांना बोलावून घेतले.
या बैठकीत ७४ इमारतींवर हा प्रकल्प उभारण्याचे ठरले. पालिकेच्या भवन विभागाच्या मदतीने शहरातील १० नाट्यगृहे, २८ रुग्णालये, २१ शाळा, ७ क्षेत्रीय कार्यालये, २ व्यापारी संकुल आणि ७ क्रीडागृहांवर हे प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील ६० इमारतींवरील प्रकल्प पूर्ण झाले असून, या पावसाळ्यात साडेपाच कोटी लिटर पाणी भूगर्भात जिरणार आहे.
पुण्यात साधारणपणे साडेसातशे मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो. एक हजार चौरस फुटांच्या छतावर साधारणपणे ७५ हजार लिटर पावसाचे पाणी पडते. मुंबईमध्ये हे प्रमाण ३ लाख लिटर आहे. तर, औरंगाबादसारख्या दुष्काळी पट्ट्यातही ८० हजार लिटर एवढे आहे.
पावसाचे पाणी भरपूर मिळते; परंतु नियोजनाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण होते. आगामी काळात लोकसंख्या वाढत जाणार आहे; परंतु पाण्याचे स्रोत तेवढेच राहणार आहेत. त्यातच आणखी ३४ गावे पालिकेत समाविष्ट होणार आहेत. पाण्याचा प्रश्न कसा सोडविणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पावसाचे पाणी भूगर्भात सोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याची बचत होऊन पुरेसे पाणी उपलब्ध होण्याचे पर्याय उभे राहणे शक्य आहे.
पालिकेच्या इमारतींसोबतच महावितरण, पोलीस, पोस्ट, बस व रेल्वे स्थानके अशा इमारतींवर जर हे प्रकल्प उभे राहिले, तर पाण्याची बचतही होईल आणि नागरिकांपुढे आदर्शही ठेवता येईल. पालिकेने तुर्तास तरी ७४ इमारतींवर हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामधून साडेपाच कोटी लिटर पाण्याची बचत होईल.
इमारत प्रकारसंख्या छताचे क्षेत्र (चौ. मी.)संभाव्य पाणीबचत
नाट्यगृह1025 हजार 8831 कोटी 94 लाख लिटर
रुग्णालय2812 हजार 64794 लाख 80 हजार लिटर
शाळा2121 हजार 3501 कोटी 61 लाख लिटर
क्षेत्रीय कार्यालय074 हजार 20031 लाख 50 हजार लिटर
व्यापारी संकुल023 हजार 16123 लाख 80 हजार लिटर
क्रीडासंकुल 076 हजार 49048 लाख 70 हजार लिटर
एकूण7573 हजार 7355 कोटी 53 लाख लिटर