अग्निशामक दलात ५५ टक्के पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:43+5:302021-03-28T04:11:43+5:30
पुणे : शहरात आणि परिसरात भीषण आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. लष्कर परिसरातील ''फॅशन स्ट्रीट'' वरील दुकानांना लागलेल्या आगीसह ...
पुणे : शहरात आणि परिसरात भीषण आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. लष्कर परिसरातील ''फॅशन स्ट्रीट'' वरील दुकानांना लागलेल्या आगीसह कोट्यावधी रूपयांच्या झालेल्या नुकसानीला राज्याचे नगरविकास खाते जबाबदार असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे. पालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के पदे रिक्त आहेत. या पदांच्या भरतीसाठीची नियमावली मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले असून नगरविकास विभागाकडे हा प्रस्ताव वर्षा़पासून प्रलंबित आहे.
पुणे आणि परिसरात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली होती. या आगीत पाच जणांना प्राण गमवावे लागले होते. फॅशन स्ट्रीटवर भीषण आग लागून कोट्यावधी रुपयांची हानी झाली आहे. या घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे, फायर सेफ्टी ऑडीट करणे व आगीच्या घटना घडल्या तरी कमीतकमी हानी व्हावी यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले जाते.
आपत्ती कुठेही घडली तरी पुण्याच्या अग्निशामक दलाला धावून जावे लागते. त्यांची मदत घेतली जाते. परंतु, बहुतांश पदे रिक्त असल्याने आहेत त्या कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे.
-----
अग्नीशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरती करण्यासाठी आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली राज्यातील अग्नीशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार करून नगरविकास मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. याला तीन वर्षे झाली तरी अजून नगरविकास खात्याने त्यावर निर्णय घेतलेला नाही.
------
पालिकेच्या अग्नीशमन दलातील मंजूर ९१० पदांपैकी ५१० पदे रिक्त आहेत. शहराचा विस्तार आणि शहराची सुरक्षितता विचारात घेता या सेवेतील पदे दीर्घकाळ रिक्त ठेवणे अडचणीचे असल्याचे पालिकेच्या आयुक्तांनी सातत्याने नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना कळविले आहे. मंत्रालयाकडून निर्णय घेतला जात नाही हे दुर्दैव आहे. सर्वपक्षीय आमदारांनी तातडीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
- विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरिक मंच