शहरातील ५५ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य; महापालिकेच्या जलशुद्धीकरणामध्ये आढळल्या त्रुटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:17 IST2025-02-11T11:16:41+5:302025-02-11T11:17:38+5:30
जानेवारी महिन्यात पुणे शहरासह जिल्ह्यात जीबीएस रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली

शहरातील ५५ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य; महापालिकेच्या जलशुद्धीकरणामध्ये आढळल्या त्रुटी
- अंबादास गवंडी
पुणे : शहरासह जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळल्यानंतर नागरिकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाणी दूषित असल्याचा मुद्दा समोर आला. परंतु महापालिकेसह आरोग्य विभागाने पाणी शुद्ध असल्याचा दावा केला. परंतु तपासणीत जलशुद्धीकरणामध्ये त्रुटी असल्याचे आढळून आले असून, शहरातील ५५ पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे दिसून आले आहे.
जानेवारी महिन्यात पुणे शहरासह जिल्ह्यात जीबीएस रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली. दूषित पाण्यामुळे हा आजार होतो असे निष्कर्ष काढण्यात आले. परंतु नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाताे, असा दावा महापालिका आणि आरोग्य विभाग केला होता. परंतु पाण्याचे चार हजारापेक्षा जास्त पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहे. त्यामध्ये ५५ पाण्याचे नमुने हे पिण्यास अयोग्य आहे, असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे महापालिका आणि आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) तपासणीत देखील दूषित पाण्यामुळेच रुग्णांना त्रास झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाण्याच्या ४६६१ नमुन्यांची तपासणी
आरोग्य विभागाने पुणे शहर आणि सिंहगड रस्ता, किरकटवाडी, खडकवासला, धायरी, नांदेड गाव या परिसरातील आतापर्यंत पाण्याच्या ४६६१ नमुन्यांची तपासणी केली. यामधील ५५ नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे निदान झाले आहे, तर 'एनआयव्ही'च्या तपासणीत काही रुग्णांच्या नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस आणि 'कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी' आढळून आले आहे. नोरोव्हायरस आणि 'कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी' यांचा संसर्ग प्रामुख्याने दूषित पाणी आणि अन्नाच्या माध्यमातून होतो, असे शक्यता वर्तविण्यात येत आहे.