राज्यात ५५०० महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग; आराेग्य तपासणीतून धक्कादायक बाब समाेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 09:32 AM2022-10-19T09:32:32+5:302022-10-19T09:32:41+5:30
आतापर्यंत ३० व त्यापुढील वयोगटातील ३६ लाखांहून अधिक महिलांची तपासणी केली
पुणे : लक्षणे असाे वा नसाे, एक तपासणी केल्यामुळे शारीरिक धाेके कसे लक्षात येतात, हे समाेर आले आहे. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत पंधरा दिवसांत राज्यात ३० वर्षांपुढील वयोगटातील महिलांची तपासणी केली असता ५ हजार ७२२ जणींना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात संदर्भित केले आहे.
आराेग्य विभागाकडून दि. २६ सप्टेंबरपासून राज्यातील महिलांची विविध आजारांच्या दृष्टीने तपासणी (स्क्रीनिंग) करण्यात येत आहे. यात आतापर्यंत ३० व त्यापुढील वयोगटातील ३६ लाखांहून अधिक महिलांची तपासणी केली. त्यापैकी १३ हजार ४७५ महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणे दिसली. त्यानंतर त्यांच्या गर्भाशयाची बायोप्सी ही कॅन्सरचे निदान करण्यासाठीची चाचणी केली. त्यात दि. १२ ऑक्टोबरपर्यंतच्या चाचणीत तब्बल ५ हजार ७२२ महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान झाले. ही तपासणीच केली नसती तर त्या सर्वजणींचा आजार उघडकीसच आला नसता.
एचपीव्ही व्हायरसमुळे कॅन्सर
ह्युमन पॅपिलाेमा व्हायरस अर्थात एचपीव्ही या विषाणूमुळे हा कॅन्सर हाेताे. जननेंद्रियाच्या ठिकाणी स्वच्छता न ठेवल्यास विषाणू व जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळेही हा कॅन्सर हाेताे. लैंगिक संबंधांद्वारे संक्रमित हाेणारा आजार आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी धर्मादाय रुग्णालये, स्वयंसेवी संस्था आणि कर्करोग रुग्णालयांशी करार करण्यात येणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत या तपासण्या पूर्ण होतील, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
आराेग्य खात्याकडून हाेतेय तपासणी
या मोहिमेत महिला आणि गरोदर मातांची बॉडी मास इंडेक्स, हिमोग्लोबिन, मूत्र, रक्तातील साखर आणि मधुमेह यासह इतर तपासण्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. या सर्व तपासण्या जवळच्या शासकीय केंद्रात माेफत आहेत.
लाजेखातर लपवली जातात लक्षणे
गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी महिला बोलायलाही सहसा टाळतात. त्यामुळे लक्षणे असूनही ती लपवली जातात. लस उपलब्ध असूनही, गर्भाशयाचा कर्करोग हे महिलांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि ते टाळता येण्यासारखे आहे.