वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कला घरघर; 56 कंपन्यांचं स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 11:44 AM2018-09-01T11:44:30+5:302018-09-01T11:46:21+5:30
अनेक कंपन्या राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कला रामराम करणार
पुणे: वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी सुविधांचा अभाव यांच्यामुळे हिंजवडीमधील 56 कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून काढता पाय घेतला आहे. यामध्ये 6 बहुराष्ट्रीय आणि 50 लहान कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दोन मोठ्या कंपन्यांनी वाहतूक कोंडीला वैतागून बालेवाडी आणि खराडी परिसरात आपला मुक्काम हलवला आहे. यानंतर आता 56 कंपन्या हिंजवडीला रामराम करणार आहेत.
राज्यातील सर्वात मोठं आयटी पार्क अशी हिंजवडीची ओळख आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि राष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं हिंजवडीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आयटी पार्कला घरघर लागली आहे. ऑफिसला ये-जा करताना करावा लागणारा वाहतूक कोंडीचा सामना आणि पायाभूत सुविधांचा अभाव यांच्यामुळे अनेक कंपन्या हिंजवडीतून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. हिंजवडीत कार्यालयात पोहोचण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. तितकाच वेळ ऑफिसमधून घरी जाण्यासाठी लागतो. त्यामुळे दिवसातील किमान चार तास वाहतूक कोंडीत जातात. यामुळे अनेक कंपन्यांनी हिंजवडीला रामराम केला आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये आयटी पार्कमधील दोन महत्त्वाच्या कंपन्या बालेवाडी आणि खराडीत स्थलांतरित झाल्या. यानंतर आता आणखी सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडीतून काढता पाय घेतला आहे. तर आणखी 50 लहान कंपन्या वाकड, बाणेर, बालेवाडी आणि पुण्यातील अन्य भागांमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कला घरघर लागली आहे.