६८ किलोमीटरच्या रिंगरोडमध्ये ५६ भुयारी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:46+5:302021-07-08T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्याच्या विकासामध्ये मोलाचा ठरणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठीची जमीन मोजणी वेगाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्याच्या विकासामध्ये मोलाचा ठरणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडसाठीची जमीन मोजणी वेगाने सुरू आहे. हा रिंगरोड करताना स्थानिक लोकांच्या सोयी-सुविधांना अधिक प्राधान्य देण्यात येणार असून, सर्व्हिस रोडसह ६८ किलोमीटरच्या पश्चिम रिंगरोडमध्ये तब्बल ५६ भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुण्याच्या रिंगरोड प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात भोर तालुक्यातील केळवडे ते मावळ तालुक्यातील उर्से असा हा ६८ किलोमीटरचा रिंगरोड करण्यात येणार आहे. या रिंगरोडवरून ताशी तब्बल १२० किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे. यासाठी रस्त्याची बांधणीदेखील अशाच पद्धतीची केली जाणार आहे. या रस्त्यालगतच सीमाभिंत बांधली जाणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांसाठी येण्या-जाण्यासाठी प्रत्येकी एक ते सव्वा किलोमीटर अंतरावर असे एकूण ५६ भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड व शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडची आखणी करण्यात आली आहे. एमएसआरडीसीच्या रिंगरोडचे पूर्व व पश्चिम असे टप्पे आहेत. पश्चिम रिंगरोड उर्से, मावळ ते केळवडे, भोर असा आहे. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांतून जाणार आहे. तर पश्चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून भोर, हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. या चार तालुक्यांतील ३८ गावांमधून हा रिंगरोड जाणार आहे. या रिंगरोडला सीमाभिंत असल्याने शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. भुयारी मार्ग बांधताना यातून ऊस वाहतूक करणारी वाहने, तसेच मोठे ट्रक जातील याचा विचार करण्यात आला आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चौकट
असा असेल पहिला टप्पा
- पश्चिम रिंगरोड केळवडे (भोर) ते उर्से (मावळ)
- रिंगरोडचा पहिला टप्पा ६८ किलोमीटर
- रिंगरोड रोडवर दर सव्वा किलोमीटरवर भुयारी मार्ग
- लोकांच्या सोयीसाठी पश्चिम रिंगरोडवर ५६ भुयारी मार्ग
- रिंगरोडवर ताशी तब्बल १२० किलोमीटर वेगाने प्रवास