ग्राहकांची लूट करणाऱ्या ५७९ औषध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:15+5:302021-09-18T04:11:15+5:30
अन्न व औषध प्रशासनाने ३२ दुकानांचे परवाने केले कायमस्वरूपी रद्द बारामती: कोरोना महामारीच्या काळामध्ये ग्राहकांची लूट करणाऱ्या तसेच गैरफायदा ...
अन्न व औषध प्रशासनाने ३२ दुकानांचे परवाने केले कायमस्वरूपी रद्द
बारामती: कोरोना महामारीच्या काळामध्ये ग्राहकांची लूट करणाऱ्या तसेच गैरफायदा घेणाऱ्या औषध दुकानांना प्रशासनाने जोरदार चपराक दिली आहे. जिल्ह्यातील २ हजार ३७४ पैकी ५७९ औषध दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ३२ दुकानांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. याबाबत राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे ॲड. तुषार झेंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती.
ॲड. झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या कालावधीमध्ये औषध विक्री दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. या महामारीच्या कालावधीमध्ये काही औषध विक्रेत्यांनी चांगल्या प्रकारे सेवा दिल्या, परंतु औषध दुकानदारांनी याचा गैरफायदा घेतला. ग्राहकांची अडवणूक करून प्रचंड लूटदेखील केली. विशेष म्हणजे काही औषध दुकानात रेडिमेड कपडेच मिळणे बाकी होते. याबाबत पुणे जिल्ह्यातील सर्व दुकानांची तपासणी करण्यासाठी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेमर्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत ॲड. झेंडे यांनी हा विषय मांडला होता. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त एस. व्ही. प्रतापवार यांनी तपासणी केली. याबाबतचा तपासणी अहवाल दिला. यानुसार पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील महानगरपालिका क्षेत्र वगळून एकूण २ हजार ३७४ औषध विक्री दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी, ५७९ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
-------------------------
कारवाईचा प्रकार व दुकानांची संख्या...
कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आलेले- ३१६
औषध दुकानांचे परवाने निलंबित - १७४
कायमस्वरूपी परवाना रद्द झालेले - ३२
कारवाईची प्रक्रिया सुरू असलेले - ५७
कारवाई अंतिम टप्प्यात असलेले - ७
यामध्ये यामध्ये बारामती व इंदापूर तालुक्यातील सहा औषध दुकानांचे परवाना निलंबित केले असून, एक मेडिकल कायमस्वरूपी रद्द केले आहे.
------------------------------