नदीपात्रात असणार पुणे मेट्रोचे ५९ खांब; पर्यावरण रक्षणासाठी घेण्यात येतेय काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:07 PM2018-01-06T12:07:43+5:302018-01-06T12:12:08+5:30
मुठेच्या पात्रात बहुचर्चित पुणे मेट्रोचे १६ ते २२ मीटर उंचीचे तब्बल ५९ खांब असणार आहेत. ते नदीला समांतर असे असतील. हे काम करताना पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेण्यात येत असून त्यासाठीच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे.
पुणे : मुठेच्या पात्रात बहुचर्चित पुणे मेट्रोचे १६ ते २२ मीटर उंचीचे तब्बल ५९ खांब असणार आहेत. ते नदीला समांतर असे असतील. नदीवर आडव्या असणाऱ्या नव्या-जुन्या अनेक पुलांपेक्षा ते ७ ते १० मीटर उंच असणार आहेत. हे काम करताना पर्यावरणाची पुरेपूर काळजी घेण्यात येत असून त्यासाठीच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे, असे महामेट्रो कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी ही माहिती दिली. नदीपात्रात काम करताना पूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यासाठी महामेट्रो कंपनीने पर्यावरणशास्त्रतज्ज्ञांची एक टीमच तयार केली आहे. त्यांच्या सूचना, तसेच पर्यावरणसंवर्धनाचे नियम पाळूनच हे काम केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. खोदकाम करताना जमिनीचा पहिला २० सेंटिमीटरचा थर काढून बाजूला जपून ठेवण्यात येत आहे. या थरातच जवैविविधता असते. काम संपले की हा थर पुन्हा तिथे बसवला जाणार आहे. नदीपात्रातून जे खांब जातील त्यांचा व्यास २ मीटर गुणिले २.५ मीटर किंवा त्यापेक्षाही कमी (आकारांमध्ये खांब आहेत) असणार आहे. नदीपात्रातून ते २२ मीटर उंचीवर असतील. नदीपात्रातील प्राणी, पक्षी व अन्य जीवसंपदेला कसलाही त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे. साप किंवा तत्सम काहीही सापडले तरीही न मारता ते इतरत्र सोडून देण्यास सांगण्यात आले आहे. पात्रातील २५ वृक्षांचा कामाला अडथळा होत आहे. ते काढावे लागतील, मात्र त्यातील १२ ते १५ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. अन्य वृक्षांच्या संख्येपेक्षा तीनपटीने त्याच जातीचे वृक्ष इतरत्र लावले जाणार आहेत, अशी माहिती बिऱ्हाडे यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात वनाज येथून मेट्रोचे खांब जमिनीतून वर आलेले दिसतील. सहा ते आठ ठिकाणांचे फौंडेशन पूर्ण झाले आहे. जमिनीच्या साधारण साडेतीन ते साडेसहा मीटरवर कठीण खडक लागतो आहे. नदीपात्रातही अनेक ठिकाणी सहा मीटरवर खडक लागला आहे. सहा ते आठ खांबांचे काम एकावेळी होत आहे. कर्वे रस्त्यावरील कामही आता येत्या आठ दिवसांत सुरू होईल. त्यासाठी वाहतूक शाखेने परवानगी दिली आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीनेच काम होत आहे, असे बिऱ्हाडे म्हणाले.
डेक्कनच्या पीएमपीच्या स्थानकाशेजारून मेट्रो जाणार आहे. त्यामुळे हे स्थानक मेट्रो स्थानकाला जोडून घेण्यात येईल. त्याशिवाय फर्ग्युसन रस्त्यावरून थेट डेक्कनपर्यंत एक अत्याधुनिक स्काय वॉक तयार करण्यात येणार आहे. तोही या स्थानकाला जोडला जाणार आहे. त्यामुळे तेथील मेट्रो प्रवासी अगदी आरामात या स्काय वॉकवरून ये-जा करू शकतील. वनाज ते रामवाडी या मार्गाचे काम गतीने होत आहे व त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे असे बिऱ्हाडे यांनी सांगितले.
वनाज ते रामवाडी या मार्गावरील वनाज, आनंदवन, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे महाविद्यालय, डेक्कन, संभाजी उद्यान व महापालिका या आठ स्थानकांचे ५०० कोटी रुपयांचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. यातील वनाज, आनंदवन व आयडियल कॉलनी या तीन स्थानकांचे डिझाईन तयार आहे. त्यालाच प्राधान्य देण्यात आले असून हे कामही आता लवकरच सुरू होईल, असे बिऱ्हाडे म्हणाले.