रविवारी तपासणीच्या तुलनेत ५.९१ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:09 AM2021-06-21T04:09:00+5:302021-06-21T04:09:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात दररोज होणाऱ्या संशयितांच्या तपासणीत नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांची टक्केवारी (पॉझिटिव्हिटी रेट) गेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरात दररोज होणाऱ्या संशयितांच्या तपासणीत नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांची टक्केवारी (पॉझिटिव्हिटी रेट) गेल्या आठवड्यात सरासरी ४़ ७१ टक्के इतकी होती़ मात्र रविवारी (२० जून रोजी) हा पॉझिटिव्हिटी रेट ५़ ९१ टक्क्यांवर गेला आहे़ कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्याने, आता शहरातील रुग्णसंख्या वाढण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे़
कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी योग्य खबरदारी घ्या, अशा सूचना वारंवार शासनाकडून देण्यात येत आहे़ तर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते येत्या महिना दीड महिन्यात ही तिसरी लाट येईल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे़ हे सर्व अंदाज व शहरातील वाढती गर्दी, वर्दळ तसेच निर्बंध कायम असलेल्या आस्थापनाही शनिवार-रविवारी पूर्णपणे उघड्या राहत असल्याने, पुणे शहर येत्या काही दिवसात राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार कार्यक्षेत्र लेवल २ च्या पुढे जाण्याची शक्यता रविवारच्या पॉझिटिव्हिटी रेटवरून दिसू लागली आहे़
पाच टक्क्यांच्या (पॉझिटिव्हिटी रेट) आत तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळून आले तर, शासनाच्या निर्देशानुसार सदर शहर लेवल दोनच्या आत राहत असून, तेथे निर्बंध शिथिल करण्यात येतात़ यामध्ये रुग्णालयांमधील एकूण आॅक्सिजन खाटांच्या क्षमतेच्या किती खाटा रिक्त आहेत या निकषाचाही समावेश होतो़ सध्या पुणे शहरात १२़ ३८ टक्के खाटा या भरलेल्या व उर्वरित रिक्त आहेत़ यामुळे शहरात ११ जून रोजी मोठ्या प्रमाणात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली़ मात्र गेल्या आठवड्यातील शहरातील सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा ४़ ७१ टक्के म्हणजे ५ टक्क्यांच्या जवळपास पोहचला आहे़ तर रविवारी तर तो ५़ ९१ टक्के गेला आहे़
----------------
आठवड्याभराचा पॉझिटिव्हिटी रेट ग्राह्य
केवळ एका दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट गृहित न धरता, आठवड्याभरातील पॉझिटिव्हिटी रेटची सरासरी काढूनच शहर ५ टक्क्यांच्या पुढे गेले की नाही हे निश्चित केले जाते़ यामुळे सध्या तरी एका दिवसाचा पॉझिटिव्हीटी रेट ५़ ९१ टक्के आला तरी तो कायमच राहील असे सांगता येत नाही़ तरीही योग्य खबरदारी, मास्कचा वापर व शासनाने सुरू ठेवलेले निर्बंध याची अंमलबजावणी करणे आता तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जरूरी ठरले आहे़
----------------------------