Scholarship List 2024: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी जाहीर; ३१ हजार ३९४ विद्यार्थी पात्र
By प्रशांत बिडवे | Published: July 2, 2024 06:02 PM2024-07-02T18:02:23+5:302024-07-02T18:02:43+5:30
यंदा इयत्ता पाचवीचे १६ हजार ६९१ आणि आठवीचे १४ हजार ७०३ असे एकुण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले
पुणे: राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयाेजित केलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षांचा अंतिम निकाल मंगळवार दि. २ जुलै राेजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. यंदा इयत्ता पाचवीचे १६ हजार ६९१ आणि आठवीचे १४ हजार ७०३ असे एकुण ३१ हजार ३९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डाॅ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.
इयत्ता पाचवी तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे रविवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ राेजी आयाेजन केले हाेते. परीक्षेचा तात्पुरता अंतरिम निकाल ३० एप्रिल राेजी जाहीर करण्यात आला हाेता. त्यानंतर मागील दाेन महिन्यांपासून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी केव्हा प्रसिद्ध हाेणार ? याची परीक्षार्थी विद्यार्थी आणि शिक्षक वाट पाहत हाेते. अखेर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या मंगळवारी दि. २ जुलै राेजी ऑनलाईन माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सायंकाळी ४ नंतर परिषदेच्या www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येतील. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे बॅंक खाते व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय गुणपत्रक पाहणे तसेच डाउनलोड करता येणार नाही. छापील गुणपत्रक शाळांना पाठविण्यात येतील असेही परिषदेने स्पष्ट केले.
शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षांचा अंतिम निकाल ही जाहीर केला असून परिषदेच्या वरील संकेतस्थळावर पाहता येईल.
परीक्षेचे नाव : परीक्षा दिलेले विद्यार्थी / पात्र विद्यार्थी / शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ( उत्तीर्ण टक्का )
इयत्ता ५ वी : ४ लाख ९२ हजार ३७३ / १ लाख २२ हजार ६३६ / १६ हजार ६९१ (२४.९१)
इयत्ता ८ वी : ३ लाख ६८ हजार ५४३ / ५६ हजार १०९ / १४ हजार ७०३ (१५.२३ )