राज्यातील 5 वी अन् 8 वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 09:47 PM2021-08-04T21:47:14+5:302021-08-04T21:53:35+5:30
राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास अडचणी येऊ शकतात.
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला. शिष्यवृत्तीपरीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी या परीक्षेची तारीख ८ ऑगस्ट अशी जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता परीक्षा आणखी ४ दिवस पुढे ढकलली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करून शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असल्याचे राज्य परीक्षा परिषदेने कळविले आहे. २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ऑगस्टमध्ये होत आहेत. या परीक्षेदरम्यान कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्यावतीने मान्यता देण्यात आली होती. मात्र, राज्यातील पूरपरिस्थी लक्षात घेऊन या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, 12 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येईल.
दरम्यान, यापूर्वीही ही परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या/तिसऱ्या रविवारी घेण्यात येणार होती. त्यानंतर करोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. पण करोनाची परीस्थिती नियंत्रणात न आल्याने पुन्हा या परीक्षेला स्थगिती देण्यात आली.