सराईत चोरट्याकडून वाहन व मोबाईल चोरीचे ६ गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:16+5:302021-08-18T04:14:16+5:30
पुणे : मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याच्या खबरीवरून पकडलेल्या सराईत गुन्हेगाराकडून २ वाहन चोरी व ४ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस ...
पुणे : मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याच्या खबरीवरून पकडलेल्या सराईत गुन्हेगाराकडून २ वाहन चोरी व ४ मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात समर्थ पोलिसांनी यश आले.
सुलतान रिजवान शेख (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. समर्थ पोलीस ठाण्याचे तपास पथक स्वातंत्र्यदिनानिमित्त गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना नाना पेठेतील आझाद आळीमध्ये चोरटा मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दुचाकीवर असलेल्या चोरट्याला पकडले. त्याच्याकडील मोबाईलबाबत चौकशी केल्यावर त्याने तो नाना पेठेतून चोरल्याचे सांगितले. त्याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने दीड महिन्यापूर्वी गणेश पेठ येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच दोन दिवसांपूर्वी सासवड येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन दुचाकी व ४ मोबाईल असा माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीकडील ३ मोबाईलच्या मालकांचा शोध सुरू आहे.
ही कामगिरी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे व त्यांच्या पथकाने केली.