पक्षी प्राणी प्रयोगशाळेसाठी पुण्याला सरकारचे ६ कोटी ४५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:11 AM2021-03-06T04:11:12+5:302021-03-06T04:11:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: पशुसंवर्धन विभागाच्या पुण्यातील नियोजित प्रयोगशाळेसाठी राज्य सरकारने ६ कोटी ४५ लाख रूपयांचा निधी वर्ग केला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: पशुसंवर्धन विभागाच्या पुण्यातील नियोजित प्रयोगशाळेसाठी राज्य सरकारने ६ कोटी ४५ लाख रूपयांचा निधी वर्ग केला. निविदा मंजूर होऊनही निधी अभावी या कामाची सुरूवात होणे रखडले होते. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर निधी प्रत्यक्ष प्राप्त झाला.
पुण्यातील ही प्रयोगशाळा राज्यातील एकमेव पक्षी प्राणी तपासणी प्रयोगशाळा असेल. जैव सुरक्षा स्तर या प्रकारातील अशा चार प्रयोगशाळा असतात. त्यातील चौथ्या क्रमाकांची देशातील एकमेव प्रयोगशाळा भोपाळमध्ये आहे. दुसऱ्या क्रमाकांची प्रयोगशाळा राज्यात फक्त पुण्यात होती. आता तिसऱ्या स्तरावरची प्रयोगशाळाही पुण्यात होणार आहे.
एकूण ७५ कोटी रूपये या विशिष्ट प्रकारच्या प्रयोगशाळेसाठी लागणार आहेत. वर्षभरापुर्वीच या कामाची निविदा मंजूर झाली होती. परंतु निधीअभावी काम रखडले होते. अलीकडे आलेल्या बर्ड फ्लू आजाराच्या पार्श्वभूमीवर अखेर ६ कोटी ४५ लाख रूपयांचा निधी देण्यात आला. या कामाला त्वरीत सुरूवात करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले.