पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईवरून तस्करी केलेले ६.९ किलो सोने जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 11:07 AM2024-01-29T11:07:34+5:302024-01-29T11:09:04+5:30
एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने जप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे....
पुणे : लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईवरून तस्करी करून आणलेले तब्बल ६ किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआयला) पकडले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने जप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
तस्करी करून आणलेल्या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३ कोटी ६० लाख आहे. या प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दुबईहून पुण्यात स्पाइस जेट विमानाने प्रवासी महिला सोन्याची तस्करी करून भारतात येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती.
त्यानुसार, एका महिलेसह दोघांची पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर झडती घेतली असता, त्यांच्याकडून तब्बल ६ किलो ९१२ ग्रॅम सोन्याची पेस्ट पांढऱ्या बेल्टमध्ये व एका पाकिटात लपवून आणल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही सोन्याची पेस्ट जप्त करून दोघांनाही या प्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.