अनुदानित बियाणांसाठी राज्यातून ६ लाख अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:11 AM2021-05-25T04:11:46+5:302021-05-25T04:11:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: खरीप हंगामात अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवर राज्यातून ६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची सोडत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: खरीप हंगामात अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवर राज्यातून ६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची सोडत काढून पात्र शेतकऱ्यांना महाबीजकडून अनुदान वगळून कमी किमतीत बियाणे मिळेल.
सोमवारी सकाळपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ५ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी मागणी नोंदवली होती. सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत मुदत असल्याने एकूण संख्या ६ लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना बियाणांसाठी किमतीच्या ५० टक्के अनुदान दिले जाते. आलेल्या अर्जांमधून केंद्राकडून प्राप्त निधीत बसेल इतक्या शेतकऱ्यांची सोडत राज्य सरकार काढणार आहे. पात्र शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे तो अनुदानित बियाणांसाठी पात्र असल्याचे कळवले जाईल. लाभार्थी शेतकऱ्याला त्याच्या हद्दीतील महाबीजच्या विक्रेत्याकडून अनुदानाची रक्कम वगळून उर्वरित किमतीमध्ये बियाणे दिले जाणार आहे.
आतापर्यंत दोनदा या योजनेची मुदत वाढवली. आता पावसाळा तोंडावर आल्याने मुदत वाढवली जाणार नाही. येत्या आठ दिवसात सोडत प्रक्रिया पूर्ण होऊन महाबीज व सर्व संबधितांना पात्र यादी पाठवली जाणार आहे. महाडीबीटी पोर्टलचे अवर सचिव (कृषी) श्रीकांत अंडगे यानी सांगितले की, पोर्टल पद्धतीमुळे यात पारदर्शकता आली आहे. दुकानांमधल्या गर्दीगोंधळालाही पायबंद बसला आहे. या आधी दुकानात पहिल्यांदा जाणाऱ्यालाच अनुदानित बियाणे मिळत असे.