बिबवेवाडी, कात्रज परिसरातून ६ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त; नववर्षाच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 11:14 AM2023-12-30T11:14:16+5:302023-12-30T11:17:10+5:30
ही कारवाई पथकाने गुरुवारी (दि. २८) केली...
पुणे : गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. बिबवेवाडी व कात्रज परिसरात केलेल्या या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुचाकीसह ५ लाख ८५ हजार ८५० रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई पथकाने गुरुवारी (दि. २८) केली.
३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष भरारी पथके तयार केली आहेत. त्यांच्यामार्फत पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी करून कारवाई करण्यात येत आहे. पुणे विभागाने गुरुवारी बिबवेवाडी येथील शिवतेजनगर या ठिकाणी छापा मारून गोवा राज्य निर्मितीस व विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी मद्याच्या १८० मिली क्षमतेच्या ९६ सीलबंद जप्त केल्या. आरोपीकडे चौकशी केली असता बिबवेवाडी येथील एका घरात साठा करून ठेवल्याची माहिती दिली. एक्साईज विभागाने त्या ठिकाणी छापा मारून विविध ब्रँडच्या ७५० मिलीच्या ३६ सीलबंद बाटल्या आणि १८० मिलीच्या ४८० सीलबंद बाटल्या (१३ बॉक्स) आढळून आल्या.
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता कात्रज येथे मद्याचा साठा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा मारला असता ७५० मिलीचे २५ बॉक्स, १८० मिलीचे ७ बॉक्स आढळून आले. या कारवाईत पथकाने ७५० मिली क्षमतेच्या ४१७ सीलबंद बाटल्या (३५ बॉक्स), १८० मिली क्षमतेच्या ८२८ बाटल्या (१७ बॉक्स), एक दुचाकी आणि आयफोन असा एकूण ५ लाख ८५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एच विभागाचे निरीक्षक अशोक कटकम, दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी, संजय राणे, सी विभागाचे नवनाथ मारकड, विशेष भरारी पथकाच्या दुय्यम निरीक्षक प्रियंका राठोड, राहुल खाडगीर, सहायक दुय्यम निरीक्षक राजेश पाटील, जवान विशाल गाडेकर, माधव माडे, गोपाल कानडे, शरद भोर, शामल शिंदे यांच्या पथकाने केली.