पीडीसीसी बँकेवरील दरोड्यात ६५ लाख लंपास
By Admin | Published: September 11, 2016 01:02 AM2016-09-11T01:02:30+5:302016-09-11T01:02:30+5:30
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राहू शाखेवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून ६५ लाख ५७ हजारांची रोकड लंपास केली.
राहू : राहू (ता. दौंड) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राहू शाखेवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून ६५ लाख ५७ हजारांची रोकड लंपास केली. या वेळी राहू सोसायटीचे सुरक्षारक्षक उत्तम वाघ यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच बँकेचे सुरक्षारक्षक दीपक भालेराव यांनादेखील दरोडेखोरांनी मारहाण केली. दोन्ही सुरक्षारक्षकांचे हात-पाय बांधून त्यांना खांबाला बांधले होते.
राहू सोसायटीची इमारत गावापासून काहीशा अंतरावर आहे. या सोसायटीच्या इमारतींमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. आज मध्यरात्रीच्या सुमारास ४ दरोडेखोर तोंडाला मास्क लावून आले. सर्वप्रथम त्यांनी दोन्ही सुरक्षारक्षकांना मारहाण करून खांबाला बांधले. त्यानंतर बँकेच्या मागील खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. बँकेतील सायरनची केबल तोडून गॅस कटरच्या साहाय्याने स्ट्राँग रूम आणि तिजोरी तोडून रक्कम लंपाास केली. साधारणत: तीन तासांच्या कालावधीत दरोडेखोरांनी बँक फोडून लूटमार केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, गुन्हे अन्वेषण विभागाचे राम जाधव, ग्रामीण सहायक अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण घटनास्थळी उपस्थित होते.