गजानन मारणेच्या आणखी ६ साथीदारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:10 AM2021-02-25T04:10:33+5:302021-02-25T04:10:33+5:30
पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढून पोलिसांना शह देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गजानन मारणे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे ...
पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढून पोलिसांना शह देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गजानन मारणे याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला असतानाच त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन अटक करण्यात येत आहे. मंगळवारी दिवसभरात कोथरूड पोलिसांनी मारणे याच्या आणखी ६ साथीदारांना अटक केली असून चार आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.
समीर प्रमोद पाटील (वय २९, रा. इंदिरा शंकरनगरी, कोथरूड), अतुल बाबू ससार (वय ३४, रा. मोकाटेनगर, कोथरूड), राहुल दत्तात्रय उभे (वय ३६, रा. एमआयटी कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), सागर शंकर हुलावळे (वय ३२, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), रामदास ज्ञानेश्वर मालपोटे (वय ३४, रा. सुतारदरा, कोथरूड) आणि कैलास भागुजी पडवळ (वय ३२, रा. श्रीराम कॉलनी, सुतारदरा, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली. एक्स्प्रेस हायवेवरून सुमारे ३०० आलिशान गाड्यांचा ताफा पुण्याकडे आला होता. याप्रकरणी तळेगाव दाभाडे, हिंजवडी, वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ व फोटोंवरून पोलिसांनी त्यांचे साथीदार व मिरवणुकीतील सामील गाड्यांचा शोध सुरू केला आहे.
गजानन मारणे अद्यापही फरार
कोथरूड पोलिसांनी गजानन मारणे याला अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मारणे व त्याच्या १० समर्थकांची जामिनावर सुटका केली. त्यानंतर मारणे हा फरार झाला आहे. त्यानंतर आणखी काही जणांना अटक केली होती. कोथरूड पोलिसांनी यापूर्वी ७ गाड्या जप्त केल्या आहेत. मंगळवारी कोथरूड पोलिसांनी या ताफ्यातील मर्सिडीज, जग्वार, पजेरो, महिंद्रा स्कॉर्पिओ अशा ४ गाड्या जप्त केल्या आहेत.
...तर मारणे याचीही मालमत्त जप्त होणार?
खंडणी प्रकरणातील फरार माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याची मालमत्ता जप्तीची कारवाई आज सुरू झाली. त्याचप्रमाणे गजानन मारणे हा सापडला नाही तर, पुणे पोलिसांकडून त्याला फरार घोषित करून त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.