सामूहिक बलात्कारप्रकरणी आणखी ६ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:15 AM2021-09-08T04:15:55+5:302021-09-08T04:15:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मित्राला भेटण्यासाठी मुंबईला निघालेल्या १४ वर्षीच्या मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने रिक्षातून अपहरण करत तिच्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मित्राला भेटण्यासाठी मुंबईला निघालेल्या १४ वर्षीच्या मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने रिक्षातून अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार प्रकरणात वानवडी पोलिसांनी आणखी ६ जणांना अटक केली आहे. त्यातील पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या मुलीवर एकूण तेरा जणांनी निर्जनस्थळी, जंगलात, लॉज आणि रेल्वे कार्यालय अशा ठिकाणी बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिराअली ऊर्फ मीरा अजीज शेख (वय २६, रा. मंगळवार पेठ), शाहुजर ऊर्फ सिराज साहेबलाल छप्परबंद (वय २८, रा. कोंढवा), समीर मेहबूब शेख (वय १९, रा. कोंढवा खुर्द), फिरोज ऊर्फ शाहरुख साहेबलाल शेख (वय २२, रा. कोंढवा), मेहबूब ऊर्फ गौस सत्तार शेख (वय २३, रा. कोंढवा खुर्द), महम्मद ऊर्फ गोलु मोज्जाम आलम (वय १९, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महम्मद ऊर्फ गोलु मोज्जाम आलम हा संबंधित मुलीचा मित्र आहे. त्याने फूस लावून मुलीला त्याच्याकडे बोलावले म्हणून त्याला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सोमवारी पहाटे ८ जणांना अटक करण्यात आली होती.
मित्राला भेटण्यासाठी घरातून निघून आलेल्या या मुलीला मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकाने अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले होते. मात्र आता एकूण १३ नावे स्पष्ट झाली आहेत. पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या तपासादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीला वानवडी पोलिसांनी चंडीगड येथून ताब्यात घेतल्यानंतर तिने ही सर्व माहिती पोलिसांना दिली.
अटक केलेल्या ६ जणांना मंगळवारी (दि.७) न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींनी यापूर्वी देखील असे काही प्रकार केले आहेत का, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, यासह गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्यांना एकूण १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी आरोपीस १० दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. वानवडी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सुधा चौधरी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.