हडपसर येथे मिनी ट्रक स्टॉलमध्ये घुसला, 6 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 12:27 PM2018-10-30T12:27:36+5:302018-10-30T12:29:36+5:30
ससाणेनगर येथून वेगाने आलेल्या एका मिनी ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक गांधी चौकातील रस्त्याकडेला असलेल्या स्टॉलमध्ये घुसला.
पुणे - ससाणेनगर येथून वेगाने आलेल्या एका मिनी ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक गांधी चौकातील रस्त्याकडेला असलेल्या स्टॉलमध्ये घुसला. तसेच ट्रकने रिक्षा व काही दुचाकींना धडक दिली. या अपघातात ५ ते ६ जण जखमी झाले असून त्यातील एकाच प्रकृती गंभीर आहे. हडपसर येथील गांधी चौकातील भाजी मार्केटच्या दारातच मंगळवारी (30 ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता हा अपघात घडला.
महापालिका अतिक्रमण विभागाचा हा मिनी ट्रक आहे. ससाणेनगर हून हा ट्रक रिकामा येत होता. सकाळच्या वेळी भाजी मंडईत तसेच या रस्त्यावर मोठी गर्दी असते. अशा वेळी हा मिनी ट्रक वेगाने आला. त्याने प्रथम एका दुचाकीला उडविले. त्यानंतर त्याने रिक्षाला धडक दिली. ट्रकचा वेग एवढा होता की रिक्षाला दिल्याने रिक्षा हवेत उडून खाली रस्त्यावर पडली. त्यानंतर त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलमध्ये शिरला. तेथील स्टॉलला धडकून तो थांबला. रिक्षातील व दुचाकीवरील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताचे वृत्त कळताच बघणाऱ्यांची मोठी गर्दी तेथे झाली होती. हडपसर पोलीस व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.