पुण्यात IPL च्या लाईव्ह मॅचवर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या ६ जणांना अटक
By भाग्यश्री गिलडा | Published: May 26, 2023 04:08 PM2023-05-26T16:08:31+5:302023-05-26T16:09:00+5:30
कारवाईमध्ये १६ मोबाईल आणि २ लॅपटॉप असा मुद्देमाला ताब्यात घेण्यात आला
पुणे : सध्या आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु आहे आणि याच पार्शवभूमीवर सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केला जातो. बुधवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट या लाईव्ह क्रिकेट सामन्यात ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या सहा जणांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. खराडी भागात असलेल्या गॅलेक्सी वन या सोसायटीमध्ये पोलिसांनी छापेमारी करत सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
बनावट वेबसाईटचा वापर करून मोबाईल आणि लॅपटॉपवरून आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर मिळालेल्या माहितीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले. त्यावरून पथकातल्या पोलिसांनी खराडी येथील गॅलेक्सी वन सोसायटीमध्ये छापा टाकला. तेव्हा ६ आरोपी मोबाईलवर सत्ता लावत असतांना आणि वहीमध्ये आकडेमोड करताना मिळून आले. या कारवाईमध्ये १६ मोबाईल आणि २ लॅपटॉप असा मुद्देमाला ताब्यात घेण्यात आला. चंदननगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे हे करत आहेत.