हरिश्चंद्रगडावर ६ तरुण भरकटले; एकाचा थंडीने गारठून दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 01:09 PM2023-08-04T13:09:38+5:302023-08-04T13:34:24+5:30
पर्यटकांनी गाईडला घेऊनच पर्यटनस्थळाचा प्रवास करावा, पोलिसांची सूचना
उदापूर : हरिश्चंद्रगडावरपर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्याहून सहा तरुण हरिश्चंद्र गडावरपर्यटनासाठी आले होते. एक तारखेला सायंकाळी तीन वाजल्याच्या दरम्यान त्यांनी तोलारखिंडीतून गडावर चढण्यास सुरुवात केली होती. मात्र दाट धुक्यामुळे रस्ता भरकटल्याने दोन दिवस हरिश्चंद्रगडाच्या जंगलातील डोंगराच्या कपारीत त्यांनी आश्रय घेतला होता, अशी माहिती मिळाली आहे.
हरिश्चंद्रगड परिसरात असणारी थंडी आणि पावसाने एका पर्यटकाची प्रकृती खालावल्याने तसेच रात्रभर थंडीने गारठून बुधवारी सकाळी दहा वाजता त्या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. बाळू नाथाराम गीते असे मृत पर्यटकाचे नाव आहे. मृत बाळू गीते यांच्यासोबत असणारे सहकारी पर्यटक अनिल मोहन आंबेकर, गोविंदा दत्तात्रय आंबेकर, तुकाराम आसाराम टिपाले, महादेव जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सर्व पुणे जिल्ह्यातील असून हरिश्चंद्रगडावर येताना ते जंगलात रस्ता भरकटले होते .अजूनही काही मुंबईकडील पर्यटक चुकले होते. ते रस्ता शोधत असताना त्यांना मृत बाळू गीते आणि त्यांचे सहकारी भेटले. रस्ता शोधत काही पर्यटकांनी खिरेश्वर येथील स्थानिकांना कळविले असता वनविभागाच्या मदतीने राजुर पोलिसांनी रेस्क्यू केले. यामध्ये वनविभागाचे महादू रेंगडे, गाईड बाळू रेंगडे, विजय नाणेकर, पुरव मेमाने यांनी बाळू गीतेसह बाकीच्या पर्यटकांना गडावरून खाली आणले. त्यातील तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून बाळू गीते यांचा मृतदेह तपासणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील राजुर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
गाईडला घेऊनच पर्यटनस्थळाचा प्रवास करावा
सध्या पावसाळ्यात जुन्नर तालुक्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे. गडकिल्ल्यांवर दाट धुके असल्यामुळे रस्ते दिसेनासे होत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनस्थळी असणाऱ्या गाईडला घेऊनच पर्यटनस्थळाचा प्रवास करणे गरजेचे आहे. - सचिन कांडगे, सहायक पोलिस निरीक्षक, ओतुर