आंबेगाव तालुक्यातील ६० टक्के गावांमध्ये कोरोना, बेड कमी पडू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:10 AM2021-04-05T04:10:27+5:302021-04-05T04:10:27+5:30
आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा अक्षरशः विस्फोट झाला आहे. १०० च्या पुढे दररोज रुग्ण सापडू लागल्याने यंत्रणेवर ताण आला आहे. शनिवारी ...
आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा अक्षरशः विस्फोट झाला आहे. १०० च्या पुढे दररोज रुग्ण सापडू लागल्याने यंत्रणेवर ताण आला आहे. शनिवारी तब्बल १२९ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. आंबेगाव तालुक्यात एकूण १०५ गावे आहेत. त्यापैकी ६२ गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडले असून ६० टक्के गावांत कोरोना पसरला आहे. मंचर, अवसरी खुर्द,निरगुडसर, घोडेगाव ही गावे हॉटस्पॉट बनली आहेत.तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील अनेक छोट्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.सध्या ॲक्टिव रुग्णसंख्या ८०० च्या पुढे गेली असून त्यामुळे रुग्णालयातील बेड कमी पडू लागले आहेत.मंचर उपजिल्हा रुग्णालय, भीमाशंकर हॉस्पिटल तसेच खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर मोठ्या संख्येने उपचार सुरु आहे. काही ठिकाणी रुग्णालय फुल झाली आहेत. त्यामुळे नवीन रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे.शासनाने कोरोना नियंत्रणासाठी अनेक निर्बंध घातले आहेत. त्यानुसार मंचर शहराचा रविवारचा आठवडे बाजार सलग दुसऱ्यांदा आज बंद होता. मात्र अनेक हॉटेल व्यावसायिकांनी त्यांचे व्यवसाय सुरू ठेवले होते. सायंकाळी सहानंतर पूर्णपणे बंद पाळला जात असून पोलिस यंत्रणा त्यासाठी सतर्क असते. मात्र छोट्या गावांमध्ये अद्याप नियमाची अंमलबजावणी होत नाहीये. रुग्णसंख्या वाढल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे काम वाढले आहे.आरोग्य सेवेतील अनेक कर्मचारी लसीकरणाच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना काहीशा मर्यादा येत आहेत. अनेक रुग्णांना लक्षण असतात मात्र ते कोरोना तपासणीसाठी जाताना दिसत नाही. आजार अंगावर काढण्याची मानसिकता वाढल्याने कोरोनाचा प्रसार वाढला आहे. ज्यांना फारसा त्रास होत नाही,असे नागरिक उपचार घेत नाहीत. मात्र त्यांच्यामुळे स्प्रेड होऊ लागला आहे. घर टू घर सर्वे करणे ही मोहीम पहिल्या लाटेच्या वेळेस राबविण्यात आली होती. त्यावेळी ती यशस्वी झाली होती. ही घर टू घर सर्वे मोहीम पुन्हा चालू करणे गरजेचे आहे. रुग्ण संख्या धोकादायकरीत्या वाढू लागली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. राज्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आढावा बैठक घेऊन प्रशासनाला योग्य सूचना दिल्या आहेत. लसीकरणाचा वेग वाढवण्याबाबत त्यांनी सूचना केली आहे. वाढत्या कोरोणामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून बेड कमी पडू लागले आहेत.
डॉ. सुरेश ढेकळे : तालुका आरोग्य अधिकारी कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असून नागरिकांनी स्वतःबरोबर कुटुंबाची ही काळजी घेतली पाहिजे. शक्यतो गर्दी टाळावी. सोशल डिस्टन्स, मास्क यांचा वापर नियमित करावा. शासनाने ज्या गाईडलाईन घालून दिल्या आहे, त्याचे पालन सर्वांनी करावे. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा आपण यशस्वीपणे मुकाबला केला आहे. दुसऱ्या लाटेला नियम पाळून कोरोनाचा प्रसार कमी केला पाहिजे.
फोटोखाली: वाढत्या कोरोनामुळे मंचर शहराचा रविवारचा आठवडे बाजार बंद होता.